सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या : पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा
जळगाव : शहरातील जोशीपेठ भागात राहणार्या 20 वर्षीय विवाहितेने पतीसह सासरचांच्या छळाला कंटाळून शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या संदर्भात विवाहितेच्या माहेरच्या मंडळींच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात रविवार, 19 डिसेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
हुंडा न मिळाल्याने विवाहितेचा छळ
बसुदेव सनत घोरई हे पत्नी तुंपा बसुदेव घोरई यांच्यासह जोशीपेठेत वास्तव्याला आहे. दरम्यान पती बसुदेव घोरई याने वारंवार लग्नात माहेरून हुंडा मिळाला नाही म्हणून माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला होता तसेच पैसे न आणल्याने विवाहितेला शिविगाळ व मारहाण करून शारीरीक व मानसिक त्रास देण्यात आला. या छळाला कंटाळून विवाहिता तुंपा घोरई यांनी शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी रात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा
पश्चिम बंगाल येथे राहणारे माहेरच्या मंडळींनी जळगावात धाव घेतल्यानंतर मृत विवाहितेचे वडील लोकेश वैद्यनाथ पंजा (52, रा.बालीडांगा, पंचायत सुलतानपूर, पश्चिम बंगाल) यांनी शनीपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलगी तुंपा हिला माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला असल्या कारणामुळे या छळाला कंटाळून मुलीने गळफास घेतला. विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती बसुदेव घोरई, सासरे सनत घोर, सासु अर्चना घोरई, नणंद, नंदोई (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात रविवार, 19 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत आरोपी पती वसुदेव घोरई याला अटक करण्यात आली.
