जळगावात महिलेची हत्या : दोघांना अटक


जळगाव : शहरातील शिवाजी नगरातील बेपत्ता झालेल्या ५१ वर्षीय विवाहितेची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला असून जळगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. विवाहितेची तापी नदी पात्रात हत्या करून बुजविण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. माया दिलीप फरसे (51, रा. क्रांती चौक, शिवाजी नगर जळगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

जंगलात आढळला मृतदेह
शहरातील शिवाजी नगरातील (Shivaji Nagar) दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या माया दिलीप फरसे (51) या महिलेचा सोमवारी जळगाव तालुक्यातील विदगाव शिवारातील जंगलात मृतदेह (Corpses) मिळून आला आहे. जादुटोण्यातून महिलेला जाळण्याचा प्रयत्न करुन तिला मारहाण करत दोन जणांनी तिचा खून केल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी पोलिसांनी संतोष रामकृष्ण मुळीक (वय 30,रा.शिवाजी नगर) या मांत्रिकासह मयताचा चुलत भाचा अमोल रतनसिंग दांडगे (वय 27, रा.शिवाजी नगर) या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.





शहर पोलिसात हरवल्याची नोंद
माया फरसे ही महिला शिवाजी नगरातील सारथी पापड कारखान्यात कामाला होती. 15 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कारखान्यात कामाला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. दिवसभर शोध घेऊनही परत न आल्याने दुसर्‍या दिवशी पती दिलीप रुपचंस फरसे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार शहर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

सीसीटीव्ही फुटेजवरुन उलगडा
दोन दिवस उलटूनही महिलेचा शोध लागत नसल्याने पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक अरुण सोनार, पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, रतन गिते व भास्कर ठाकरे यांनी सोमवारी शिवाजी नगरातील फुटेज तपासले असता माया ह्या त्यांचाच चुलत भाचा अमोल दांडगे यांच्यासोबत जात असल्याचे दिसून आले. त्यांच्या एका हातात पिशवीही होती. हे फुटेज माया यांच्या पतीला दाखविले असता त्यांनी दोघांना ओळखले. सीसीटीव्ही फुटेज आधारावरुन रतन गिते व भास्कर ठाकरे यांनी सर्वात आधी सीसीटीव्हीत फुटेजमध्ये महिलेसोबत दिसून येणार्‍या अमोल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मांत्रिक संतोष मुळीक यांची माहिती मिळाल्यावर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

तर पैशांचा पाऊस पडेल….
सुरुवातीला ताब्यात घेतलेल्या दोघांनी नकार दिला. दोघांचा खाकीचा हिसका दाखविल्यावर त्यांनी घटनेची कबूली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष दांडगे हा मंत्रोपचार करतो. त्याच्या घरात हेच साहित्य मिळून आले. महिलेचा बळी दिला तर पैशाचा पाऊस पाडता येईल व त्यातून आपल्याला खूप पैसे मिळतील, असे संतोष याने अमोल याला सांगितले होते. त्यानुसार अमोल माया यांना घेऊन गेला होता. घनदाट झुडपात जाळल्यानंतर खोल खड्डयात या महिलेचा मृतदेह टाकून देण्यात आल्याचे समोर आले आहे.

शिरागड जायचे सांगून महिलेला नेले
शिरागड येथे जायचे आहे व तेथे आपल्याला पूजा करायची असल्याचे सांगून अमोल हाच माया यांना घेऊन गेला होता. शिरागड न जाता विदगाव पुलानजीकच्या जंगलात नेले तेथे आधीच संतोष थांबलेला होता इतकी माहिती अमोल याने दिली. त्यावरुन पोलिसांनी दुपारी दोघांना घटनास्थळ दाखविण्यासाठी नेले असता तेथे माया यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. दोघांनी रात्री उशिरापर्यंत थेट खुनाची कबुली दिली नसली तरी मंत्रोपचारासाठी माया यांना घेऊन जाण्यासह त्यांचा मृतदेह जेथे होता तेथेच पोलिसांना नेले. यावरुन दोघांनीच खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. दरम्यान, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वासुदेव मराठे, विश्वनाथ गायकवाड आदींनीही घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शहरचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व कुंभार या दोन्ही अधिकार्‍यांनी दोघं संशयितांची कसून चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक झालेली नव्हती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !