अ‍ॅड.रोहिणी खडसेंवर हल्ला ; हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू : पोलिस अधीक्षक


मुक्ताईनगर : जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कोथळी-मुक्ताईनगर दरम्यानच्या सूतगिरणीजवळ घडली होती. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच जिल्हा पोलिस प्रशासनातील अधिकारी मुक्ताईनगरात दाखल झाले आहेत. या घटनेनंतर खडसे कार्यकर्ते संतप्त झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनीदेखील मुक्ताईनगरात धाव घेऊन घडल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. ते म्हणाले की, पोलिसांनी घटनेच्या अनुषंगाने तपास सुरू केला असून लवकरच आरोपींवर कारवाई केली जाईल.

वक्तव्यामुळे अ‍ॅड.खडसे चर्चेत
अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटलांना (Mla Chandrakant Patil) चोपण्याची भाषा केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. रविवारी भुसावळ विभागात अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या वक्तव्याचा शिवसेना पदाधिकार्‍यांनी जोरदार निषेध नोंदवत ठिकठिकाणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी निवेदनही दिले होते. ही सर्व घटना ताजी असतानाच अ‍ॅड.खडसे यांच्या वाहनावर अज्ञाताने दगडफेक करून हल्ला केल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.



अज्ञातांनी चढवलेला वाहनावर हल्ला
सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अ‍ॅड.रोहिणी खडसे (Add.Rohini Khadse) या एका हळद समारंभावरून हजेरी लावून मुक्ताईनगरकडे येत असतांना त्यांच्या वाहन (एम.एच. 19 सी.सी.1919) ला ओव्हरटेक करून एक दुचाकी आल्यानंतर वाहनचालकाने वाहनाचा वेग कमी करताच पाठीमागून पुन्हा दोन दुचाकीस्वार आले व त्यांनी आपल्याकडील लोखंडी आसारीने वाहनाच्या दर्शनी भागावर हल्ला केला. काही कळण्याआत हल्लेखोर पसार झाले. हल्ला घडला तेव्हा कारमध्ये अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होते. या हल्ल्यात अ‍ॅड.रोहिणी खडसे (Add.Rohini Khadse) व अन्य दोघांना काही दुखापत झाली नसलीतरी अचानक घडलेल्या घटनेने थरकाप उडाला. हल्लेखोर हे संख्येने सहा ते सात होते व ते लागलीच दुचाकीवरून पसार झाले.

मुक्ताईनगरात मोठ्या प्रमाणावर कुमक दाखल
अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने खडसे समर्थक व कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वरीष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त मुक्ताईनगर शहरात दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !