हा तर भ्याड हल्ला ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार : आमदार चंद्रकांत पाटील


मुक्ताईनगर : जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष व संचालक रोहिणीताई खडसे यांच्या कारवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आपण निषेध करतो, हा हल्ला नेमका कोणी व का केला ? या प्रकाराची आता उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे असून दोषींवर कारवाई होण्यासंदर्भात आपण विधानसभेत मंगळवारी मागणी करणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील (Mla Chandrakant Patil) यांनी दिली आहे.

पावन परंपरेला गालबोट
आमदार चंद्रकांत पाटील (Mla Chandrakant Patil)
म्हणाले की, मुक्ताईनगर मतदारसंघात अनेक पदांवर महिला पदाधिकारी विराजमान असून त्या यशस्वीपणे काम करीत आहे मात्र अशा पद्धतीने महिलांवर प्रथमच झालेल्या हल्ल्याने मुक्ताईनगरच्या पावन परंपरेला गालबोट लागले आहे. या घटनेचा आपण तीव्र निषेध करत असल्याचे निवेदन त्यांनी जारी केले आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण मंगळवारी विधानसभेत करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.



अज्ञातांनी चढवला वाहनावर हल्ला
सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अ‍ॅड.रोहिणी खडसे (Add.Rohini Khadse) या एका हळद समारंभावरून हजेरी लावून मुक्ताईनगरकडे येत असतांना त्यांच्या वाहन (एम.एच. 19 सी.सी.1919) ला ओव्हरटेक करून एक दुचाकी आल्यानंतर वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी करताच पाठीमागून पुन्हा दोन दुचाकीस्वार आले व त्यांनी आपल्याकडील लोखंडी आसारीने वाहनाच्या दर्शनी भागावर हल्ला केला. काही कळण्या आत हल्लेखोर पसार झाले. हल्ला घडला तेव्हा कारमध्ये अ‍ॅड.रोहिणी खडसे (Add.Rohini Khadse) यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होते. या हल्ल्यात अ‍ॅड.रोहिणी खडसे (Add.Rohini Khadse) व अन्य दोघांना काही दुखापत झाली नसलीतरी अचानक घडलेल्या घटनेने थरकाप उडाला. हल्लेखोर हे संख्येने सहा होते व ते लागलीच दुचाकीवरून पसार झाले.

पोलीस अधिकाऱ्यांची धाव
हल्ल्याच्या प्रकारानंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी मुक्ताईनगरात तळ ठोकून आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे आता संशयीत आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !