सुकळी हद्दीत आढळलेल्या ‘त्या’ मृत महिलेचा घातपातच !
निळे निशान संघटनेचा पत्रकार परीषदेत दावा : शवविच्छेदनापूर्वीच दाखल केला गुन्हा
मुक्ताईनगर : तालुक्यातील सुकळी शिवारातील वडोदा वनक्षेत्रातील कंपार्टमेंट नंबर 441 व 442 मधील पाण्यात आढळलेल्या 31 वर्षीय विवाहितेचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय निळे निशाणचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी मुक्ताईनगरात सोमवारी सायंकाळी सात वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत व्यक्त केला. दरम्यान, मयत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी 48 तासात योग्य तपास न केल्यास निळे निशानतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देखील पत्रकार परीषदेत देण्यात आला.
नाल्यात आढळला होता मृतदेह
28 डिसेंबर रोजी ज्योती विलास लहासे (31) ही महिला हरवल्याची तक्रार महिलेचा मावसभाऊ कैलास तायडे (खामखेडा) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दाखल केली. ही महिला 25 डिसेंबर रोजी ही मावस भावाच्या घरी लग्नसमारंभासाठी रावेर तालुक्यातील विटवे येथून आली व 28 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास शौचालय जाते, असे सांगून बाहेर पडली मात्र खामखेडा गावापासून सुकळी वनविभागाच्या हद्द लागण्यापर्यंत अर्धा किलोमीटर शेती असून तिला एका शेतकर्याने सुद्धा या महिलेने जाताना पाहिले मात्र त्यानंतर ती महिला कोणालाही दिसली नाही. 31 रोजी सायंकाळी तिचे प्रेत सुकळी वन विभागाच्या एका नाल्यात आढळले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी दीपक मनोरे व सुकलाल वाघ या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला माच्त्र कुठलाही तपास न करता आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला कसा? असा प्रश्न बाविस्कर यांनी उपस्थित केला. महिलेच्या शवविच्छेदन अहवाला आधीच हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा पोलिस अधीक्षकांची आपण भेट घेतली असून मुक्ताईनगर पोलिसांनी महिला हरवल्याचा तपासाचा संदेश हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तत्काळ 28 तारखेलाच पाठवला असता शेवटचे लोकेशन घेऊन तपास केला असता तर कदाचित महिला जिवंत आढळून आली असती मात्र पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप खंडारे यांनी तपासात दिरंगाई केल्याचा आरोप बाविस्कर यांनी केला आहे. येत्या 48 तासात या गुन्ह्याची चौकशी करण्यात यावी अन्यथा निळे निशाण संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही बाविस्कर यांनी दिला.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी रावेरचे कार्याध्यक्ष शरद बगाडे, उपाध्यक्ष नारायण सवणे, अनिल धनगर, जलील खान, रोहित बाविस्कर, ब्रिजलाल आढांगळे, मयत महिलेचा मावसभाऊ कैलास तायडे यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


