चटई कंपनी मालकाला दोन लाखांमध्ये गंडवले
जळगाव : चटई तयार करण्यासाठी लागणार्या प्लास्टिक दाण्याच्या मटेरीयलचा पुरवठा करण्याची बतावणी करत भामट्याने एमआयडीसीतील चटई कंपनीच्या मालकाला दोन लाखांचा चुना लावला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रॉ मटेरीयलच्या नावाखाली फसवणूक
अयोध्या नगरातील रहिवासी संतोष महिपत इंगळे (56) या उद्योजकाची एमआयडीसीत शक्ती पॉलीमर्स नावाची चटई कंपनी आहे. नेहमीप्रमाणे कंपनीत असताना जगतपुरा जलपूर येथील श्री श्याम एंटरप्राइजेजचे कुंदनलाल नामक व्यक्तीने संतोष इंगळे यांना संपर्क साधला. चटई बनविण्यासाठी लागणारा प्लास्टिक दाणा रॉ मटेरीयलचा पुरवठा करतो, असे सांगून विश्वास संपादन केल्याने इंगळे यांनी सहा टन विविध प्लास्टिक दाणा मालाची ऑर्डर दिली. या ऑर्डरनुसार संबंधिताने इंगळे यांच्याकडून 1 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन दोन लाख रुपये स्विकारले. पैसे देऊनही संबंधिताने मालाचा पुरवठा न केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर उद्योजक संतोष इंगळे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर श्याम इंटरप्रायजेसचे कुंदनलाल नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहेत.





