ट्रॅक्टर ट्रॉली चोरटा एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव : भडगाव तालुक्यातील कनाशी येथून ट्रॅक्टरची ट्रॉली चोरणार्या संशयिताला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रवीण मदन मालचे (३२, रा. वलवाडी, ता.भडगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
भडगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा
भडगाव तालुक्यातील कनाशी येथून ट्रॅक्टरची ७० हजार रुपये किंमतीची ट्रॉली चोरल्याप्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयितांबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली. भडगाव तालुक्यातीलच असलेल्या तीन संशयितांनी ट्रॉली चोरून ती धुळे जिल्ह्यातील बोरकुड येथे विकल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देवरे सुनील दामोदरे, लक्ष्मण पाटील, संदीप साबळे, किशोर राठोड, रणजित जाधव , श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पवार, मुरलीधर बारी यांच्या पथकाने गुरूवारी भडगावातून तिघांपैकी प्रवीण मालचे या संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्याने त्याच्या दोन साथीदारांसोबत कनाशी येथुन ट्रॉली चोरीची कबुली दिली आहे. संदीप उर्फ तात्या आनंदा भिल (रा.भोरटेक, ता.भडगाव) व गोरख ठाकरे हे दोघे संशयित पसार असून त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान चोरलेली ट्रॉली पोलिसांनी हस्तगत केली असून पुढील कारवाईसाठी संशयिताला भडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.





