अडचणीत मोठी वाढ : केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह नितेश राणेंविरोधात या कारणास्तव दाखल झाला गुन्हा
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्याविरुद्ध मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दिशा सालियन आत्महत्येप्रकरणी उलटसुलट वक्तव्ये करून तिची बदनामी केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलात्कार करून हत्या केल्याचा केला होता दावा
दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला होता तसेच नितेश राणे यांनीही सोशल मीडियावर तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. राणेंच्या दाव्यांमुळे आपल्या मुलीचे चारीरत्र्यहनन आणि बदनामी होत असल्याचा आरोप सालियन कुटुंबीयांनी केला होता. रविवारी सालियन कुटुंबीयांनी मालवणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर राणे पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पिता-पूत्रांचे सोशल मिडीया खाते बंद करण्याची चाकणकरांची मागणी
दरम्यान, मालवणी पोलिसांच्या शवविच्छेदन अहवालात दिशावर बलात्कार झाला नसल्याचे तसेच ती गरोदर नसल्याचेही स्पष्ट झाले आहे, असे राज्य महिला आयोगाने म्हटले आहे. दिशाची बदनामी करणार्या राणे पिता-पुत्रांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे.
