आयशर-पिकअपमध्ये भीषण अपघात ; तिघा तरुणांचा जागीच मृत्यू
दिंडोरी : आयशर ट्रक आणि पिकअप यांच्यात भीषण अपघात होऊन त्यात तीन जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत हे चाचडगावचे रहिवासी आहेत. हा अपघात नाशिक-पेठ महामार्गावर चाचडगाव परीसरात घडला.
अपघातात पिकअप चक्काचूर
नाशिककडून गुजरातकडे जाणारा आयशर ट्रक (क्रमांक एम.एच. 15 पी.व्ही.8934) जात असताना चाचडगावकडून पिकअप (क्रमांक एम.एच.15 ये.जी. 937) येत असताना या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चाचडगाव येथील संतोष हिरामण लांडे (25), हेमंत रघुनाथ मोरे (26), कमलेश सुखदेव मोरे ( 27) हे तीन तरुण जागीच ठार झाले तर लखन भगवान गांगोडे (25), रवींद्र वामन पोटींदे (27) यांना नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर पोलीस अधिकाऱ्यांची धाव
अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी उमराळे बुद्रुक पीआय वाघ, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, हवालदार धनंजय शीलवटे, चाचडगाव पोलीस पाटील पुरुषोत्तम पंडित यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी चाचडगाव येथील ग्रामस्थांनी मदत कार्य केले. पुढील तपास दिंडोरी पी आय व कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शीलवटे करीत आहेत.
