क्षणात कुटुंबाची राखरांगोळी : पत्नी व मुलीची हत्या करीत स्वतःलाही संपवले
नागपूर : कौटुंबिक वादातून पतीने आधी मुलीची व नंतर पत्नीची हत्या केली व स्वतःदेखील गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नागपूरात उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीव नगर जवळील सरोदी मोहल्ल्यात ही घटना घडली. विलास चंपतराव गवते (40), मुलगी अंकिता (10) व पत्नी रंजना (35 वर्ष) अशी मयतांची नावे आहेत.
मध्यरात्री घटना उघडकीस
शनिवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घराच्या शेजारीच राहणार्या नातेवाईकांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पत्नी आणि मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या करणारा विलास रागीट स्वभावाचा होता. परिसरात तो कोणाशीही जास्त बोलत नव्हता, अशी माहिती समोर आली.

नातेवाईकांना दृश पाहून बसला धक्का
पहाटे तीनच्या सुमारास मुलगा जागा झाला त्याने जवळच झोपलेल्या आई आणि बहिणीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. घरात वडील नाहीत, हे पाहिल्यानंतर तो उठून शेजारीच राहणार्या नातेवाईकांच्या कडे गेला आणि सर्व घटना सांगितली…. नातेवाईकांनी विलासचा शोध घेतला. तेव्हा ते घराजवळच्या एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर नातेवाईकांनी घटनेची पोलिसांना माहिती दिली.
पत्नीवरील संशयामुळे हत्याकांडाचा संशय
नागपूर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत सरोदी मोहल्ल्यात कुटुंब प्रमुखाने पत्नी व मुलीची हत्या करत आत्महत्या केल्याची घटना मानसिक असंतुलन व पत्नीवरील शंकेमुळे घडली असल्याचं बोललं जात आहे. मारेकरी विलास एकलकोंड्या स्वभावाचे होते, मनातली गोष्ट कोणाला सांगत नव्हते. त्यामुळे त्यांचा मानसिक तणाव वाढत गेला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाची राखरांगोळी झाली.


