कांताई बंधार्यात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू
जळगाव : कांताई बंधार्यात बुडून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडली. शुभम कांतीलाल चव्हाण (20) असे मयत तरुणाचे नाव आहे.
एकाला वाचवण्यात यश
शहरातील वानखेडे सोसायटी साईबाबा मंदिराजवळ भागातील शुभम कांतीलाल चव्हाण (20) हा तरुण पाच मित्रांसोबत रविवार, 13 मार्च रोजी दुपारी कांताई बंधारा परीसरात फोटो काढण्यासह पर्यटनासाठी गेला होता. यावेळी दोघे पाय घसरून बंधार्यात पडले मात्र एकाला वाचवण्यात यश आले तर शुभम चव्हाण हा पाण्यात बुडाला.
जळगाव पोलिसांची धाव
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू केले. घटनेची माहिती मिळताच शुभमच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला होता. शुभम चव्हाणचे वडील हे शहरातील नवीन बी.जे.मार्केटमध्ये चव्हाण इलेक्ट्रिकल्स नावाचे दुकानात काम करतात. तरुणाच्या पश्चात दोन बहिणी, आई-वडील आणि आजोबा असा परीवार आहे. शुभम हा एकूलता एक असल्याने त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात आली.


