खाकी डागाळली : पोलिस चौकीतच केली ‘ओली पार्टी’ ; या शहरातील धक्कादायक घटना
नाशिक : टवाळखोरांची तक्रार देण्यासाठी जागरूक नागरीक गेल्यानंतर पोलिस चौकीतच दारूची पार्टी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत डी.के.नगर पोलीस चौकीमध्ये मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पोलिसांची रंगलेली ओली पार्टी आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, यावेळी पोलिसांनी 55 ते 60 वर्षीय नागरीकाला चौकीत घेऊन दरवाजा लावून घेत लाईट बंद करून बेदम मारहाण केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
उच्चभ्रू परीसरात चौकीत रंगली ओली पार्टी
गंगापूर रोड आकाशवाणी टॉवर, निर्मला कॉन्व्हेंट शाळेचा परिसर सुशिक्षित उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. या भागातील डी.के.नगर पोलिस चौकीत बाळासाहेब शिंदे हे उद्यानात बसलेल्या टवाळखोरांची तक्रार देण्यासाठी गेले होते. यावेळी चौकीत 5 ते 6 पोलिस कर्मचारी ओल्या पार्टीत ‘झिंगाट’ झालेले होते. त्यांनी त्यांना आतमध्ये बोलावून घेतले आणि लाईट बंद करून मारहाण केली, असे येथील प्रत्यक्षदर्शी नागरीकांनी सांगितले. हा प्रकार जेव्हा परीसरात समजला तेव्हा रहिवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली. यावेळी एका मद्यपी पोलिसाने शिवीगाळ करत चौकीतून पळ काढला. नागरीकांनी दुचाकीने पाठलाग करत त्याला रोखले. त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले असता नंतर तो पोलीस चौकीत आला.
पोलिस चौकीला बनवले ‘बार’
कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अशाप्रकारे पोलिस चौकीतच दारू पार्टी रंगवून चौकीचा ‘बार’ बनविल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मद्यपी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांनी केली आहे. यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती नागरीकांनी गंगापूर पोलिस ठाण्यात कळविली असता त्यांनतर घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आदी अधिकारी दाखल झाले. दरम्यान, शिंदे यांनी तक्रार देण्यासाठी गंगापूर पोलिस ठाणे गाठले. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुनाथ ठाकूर, सागर बोधले, सुरेश जाधव, मयूर सिंग असे पार्टी करणार्या संशयीत पोलिसांची नावे असल्याचे समजते.
एका मद्यपी पोलिसाला घेतले ताब्यात
मद्यपी पोलिसांपैकी एकाला रात्री पोलिसांनी ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते बाकीचे चार पसार झाले. त्यांची वैद्यकीय तपासणी होऊ शकली नाही. कायदा व शिस्तप्रिय आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलिस आयुक्त दीपक पांडेय याप्रकरणी काय भूमिका घेतात आणि मद्यपी पोलिसांवर काय कठोर कारवाई होते? याकडे आता लक्ष लागले आहे.


