भुसावळात किसान एक्स्प्रेसच्या बोगीला लावली आग


भुसावळ : सोमवारी सायंकाळी किसान एक्स्प्रेसच्या कांदा असलेल्या बोगीला आग लागल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, ही आग का लागली? याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले असता कांदा चोरीचा प्रयत्न यशस्वी न झाल्याने तीन जणांपैकी एका महिलेने आगपेटीची पेटती काडी बोगीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रेल्वे सुरक्षा बलातर्फे उपदव्यापींचा शोध सुरू असून एकाला अटक करण्यात आली आहे.

आगीमुळे उडाली खळबळ
येवला येथून कांदा भरून मुजफ्फरपूर येथे जाणारी किसान एक्स्प्रेस सोमवारी सायंकाळी 5.50 वाजता भुसावळ स्थानकावरील फलाट 7 वर आली. यानंतर काही वेळाने इंजिनपासून चौथ्या डब्यातून धूर निघत असल्याचे स्थानकावरील विक्रेत्यांच्या लक्षात आले. त्यांनी धावपळ करून धूर निघणार्‍या भागात पाण्याचा मारा केला. ही माहिती मिळताच स्टेशन डायरेक्टर जी.आर.अय्यर घटनास्थळी आले. कर्मचार्‍यांनी बोगीचा दरवाजा उघडून कांद्याच्या गोण्या बाहेर काढल्या. तरीही 12 गोण्या जळाल्याचे समोर आले. यामुळे पुढील अनर्थ टळला.

अधिकार्‍यांनी केली पाहणी
डीआरएम कार्यालयातून एडीआरएम नवीन पाटील यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली. आरपीएफ निरीक्षक मीना यांनी पंचनामा केला. यानंतर ही गाडी रात्री 8.40 वाजता मुजफ्फरपूरकडे रवाना झाली.

फुटेजमधील चित्रण असे
किसान एक्स्प्रेसच्या इंजिनपासून चौथ्या क्रमांकाच्या बोगीला आग लागली कशी? याचा शोध घेण्यासाठी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात सव्वा सहा वाजेच्या सुमारास एक व्यक्ती, एक महिला व मुलगा हे तिघे चौथ्या क्रमांकाच्या बोगीतून कांदे चोरून पिशवीत भरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गाडीच्या खिडकीतून कांदे चोरीचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होत नव्हता. यामुळे महिलेने आगपेटीची पेटती काडी बोगीत टाकली. यानंतर तिघांनी तेथून काढता पाय घेतला. सायंकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी हा प्रकार झाला. काही वेळाने या बोगीतून धूर निघत असल्याने पुढील प्रकार उघडकीस आल्याचे फुटेज-मध्ये दिसल्यानंतर एकाला अटक करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !