उसनवार दिलेल्या अवघ्या चार हजारांसाठी त्याने केला मित्राचाच खून
पुणे : मोबाईल खरेदीसाठी उसने दिलेलेचार हजार रुपये परत न दिल्याने मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना पुण्यातील डेंगळे पुलाजवळ सोमवारी घडली होती. दरम्यान, आरोपीने मृताच्या घरी जाऊन धिंगाणा घातला. तसेच मृत मित्राने पैसे न देता फसवणूक केल्याची तक्रारही पोलिसांत दिली. दरम्यान, या घटनेत सद्दाम ऊर्फ इस्माईल शेख (25, रा. बुधवार पेठ) या तरुणाचा खून झाला असून बबलू ऊर्फ अब्दुल्ला सरदार (35, बुधवार पेठ) या संशयिताला बुधवारी पोलिसांनी अटक केली. सरदार याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
डोक्यात दगड घालून केला खून
सद्दाम व बबलू हे मित्र असून ते पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. सद्दाम हा बिगारी काम करत होता, तर आरोपी बबलू हा एका पानटपरीवर कामाला आहे. दोन दिवसांपूर्वी सद्दाम याने बबलू याच्याकडून मोबाइल घेण्यासाठी उसने पैसे घेतले होते. मात्र, त्याला सद्दाम हा एका वेश्येसोबत दिसला. यामुळे आपण मोबाईलसाठी दिलेल्या पैशावर तो मौजमजा करत असल्याचा बबलूला राग आला. सोमवारी सायंकाळी ढेंगळे पुलाखाली त्यांच्यात वाद झाला. त्या वेळी बबलूने दगड घालून खून केला.





