देवपिंप्रीच्या वृद्धाचा घराचा जीना कोसळल्याने मृत्यू
जळगाव : जामनेर तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसात घराचा जीना कोसळल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. तीन महिन्यांपूर्वीच बांधलेल्या घराचा जिना कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यशवंत मांगो वाघ (70, रा. देवपिंप्री वसाहत, ता. जामनेर) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
अचानक कोसळला जीना
रविवारी रात्री नऊ वाजता मुसळधार पाऊस, वादळ सुरू झाल्यानंतर घराच्या छतावर असलेले साहित्य आणण्यासाठी वाघ जिन्यावर चढले होते. वादळाचा जोर वाढत असल्याने काही सेकंदातच सिमेंटचा जिना कोसळला. त्यात वाघ यांचे पोट, कमरेवर जबर दुखापत झाली. ते जिन्याखाली दाबले गेले होते. घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी वाघ यांना नेरी येथील रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर रात्रीच मृतदेह जीएमसीत आणला. सोमवारी सकाळी 11 वाजता शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.