मारहाण प्रकरणात शिक्षा सुनावताच आरोपींचे न्यायालयातून पलायन
Defendants flee court after sentencing in assault case उमरी : उमरी न्यायालयातून तीन आरोपींनी पोलिसांच्या हातातर तुरी देवून पळ काढल्याल्याने खळबळ उडाली आहे. सुनावणीदरम्यान आरोपींना मारहाण प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर संशयीतांनी पळ काढला आहे. अविनाश निवृत्ती क्षीरसागर (वय 37), प्रकाश रमेश क्षीरसागर (29), रमेश माणिका क्षीरसागर (तिघेही रा. कोल्हा, ता. मुदखेड) अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत.
तीन वर्षांच्या शिक्षा ऐकताच आरोपींचे पलायन
2012 मध्ये उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हा या गावात झालेल्या मारामारीच्या प्रकरणात 1 जुलैला दुपारी या तिन्ही आरोपींना न्यायमूर्ती ए. बी. रेडकर यांनी तीन वर्षांचा कारावास व प्रत्येकी 35 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. यानंतर या आरोपींना पोलीस जमादार हणमंत सुगावे यांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींना न्यायालयाबाहेर नेत असताना अचानक तिन्ही आरोपींनी संगनमत करून पोलिसांच्या हाताला झटका मारला व पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते हाती लागले नाहीत. याबाबत जमादार सुगावे यांच्या तक्रारीवरून उमरी पोलिसांत फरार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
