साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा…
संत मुक्ताई पालखीचे आगमन : मुक्ताईनगरात आषाढी वारी पालखीचे जल्लोषात आगमन : पुष्पवृष्टीने वेधले लक्ष
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताबाई आषाढी परतवारी पालखी सोहळ्याचे आगमन सोमवार, 1 ऑगस्ट रोजी मोठ्या जल्लोषात झाले. मुक्ताईनगरातील नवीन मुक्ताबाई मंदिरापासून मुक्ताई संस्थान व पालखी आगमन सोहळा उत्सव समिती, ग्रामस्थ मंडळी मुक्ताईनगर, कोथळी, सालबर्डी व मुक्ताई वारकरी बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धा पार पडली. तीन गटातील स्पर्धांना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. स्पर्धेत 64 भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.
पालखी सोहळ्याने फेडले डोळ्यांचे पारणे
सुखाचे गोठी सुख आले भेटी, तया लाभचियेसाठी जीव वेचीला माये, तवा अवचिते सगुण रूप भरले से नैयनी, बोलता अंगणी म्या वो देखीयेले या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाला अनुसरून मुक्ताईनगर पालखी सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले. श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर येथून श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी पालखी सोहळा अखंडितपणे 312 वर्षांपासून जातो. कोथळी-मुक्ताईनगरात पालखी परत येताना शहर व परीसरातील नागरीक पालखी आगमन सोहळा भव्य-दिव्य उत्सवाने साजरा करतात. यावर्षी सोमवार, 1 ऑगस्ट रोजी पालखीचे जल्लोषात आगमन झाले. वारकरी संप्रदायातर्फे दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली.

मुक्ताईनगर शहर सजले
मुक्ताईनगर शहर भगव्या पताका व केळीचे खांब लावून सजवण्यात आले होते. नवीन मुक्ताई मंदिरात पादुका पालखी सोहळ्याचे संस्थांचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रसंगी पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र महाराज हरणे, हभप विनायकराव हरणे, हभप उद्धव महाराज जुनारे व विश्वस्त मंडळ, भाविक भक्त वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुष्पवृष्टीने वेधले लक्ष
शहरातील मुक्ताई चौकामध्ये पालखी सोहळ्याचा रथ तसेच दिंडीत सहभागी भजनी मंडळावर योगराज कंट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे यांच्याकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखी सोहळा आगमनानिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकरी महिलांनी रस्त्यावर स्वागतासाठी रांगोळी काढली तसेच ठिकठिकाणी भाविकांकडून चहा, फराळ व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मुक्ताई चौकात मुक्ताईनगर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष मनीषा पाटील, मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, पालिकेचे अधिकारी, नगरसेवक, कर्मचारी, नगरसेविका यांचे वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.
लोकप्रतिनिधींनी केले स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर आमदार एकनाथराव खडसे, मंदाकिनी खडसे, अॅड.रोहिणी खडसे व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पालखीचे स्वागत केले. पुढे प्रवर्तन चौकात आमदार चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक उपस्थित राहत दिंडीत सहभागी वारकर्यांचे स्वागत केले. प्रसंगी नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, नवीन मुक्ताई मंदिर ते कोथळी येथील मुक्ताई मंदिरापर्यंत चाललेल्या या सांप्रदायिक दिंडी सोहळा तब्बल साडेतीन तास चालला. नंतर कोथळी येथे मुक्ताई मंदिरात हभप रवींद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन व दिंडी स्पर्धेत बक्षीस पात्र भजनी मंडळांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला.नंतर गंगा फळाची भाजी, शिरा, भात व पोळी असा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला. गायन, वादन, ताल, सूर, पावली, वेशभूषा दिंडी े सादरीकरणाचे नवीन मंदिर ते जुने मंदिर दरम्यान सहभागी दिंड्यांचे परीक्षण पद्माकर मोरे अकोला, सर्जेराव महाराज देशमुख, विलास काळे मलकापूर यांनी केले .
यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
हभप उद्धव महाराज जुनारे, पुरुषोत्तम वंजारी, श्रीकांत पाटील, निवृत्ती पाटील, उमेश राणे, विशाल सापधरे, पूंजाजी झोपे, ज्ञानेश्वर हरणे, पोलिस पाटील संजय चौधरी यांच्यासह आगमन सोहळा उत्सव समिती व समस्त ग्रामस्थ कोथळी, सालबर्डी, मुक्ताईनगर यांनी सोहळा यशस्वीतेसाठी नियोजन केले.
