Elderly man robbed at knifepoint: Robbers in Jalgaon’s net चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले : जळगावातील लुटारू जाळ्यात
जळगाव : नाशिकहून मुलीला भेटण्यासाठी जळगावात आलेल्या 78 वर्षीय वृध्दाला लुटणार्या दोन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश उर्फ चोक्या अरुण जोशी आणि लक्ष्मण उर्फ चिंट्या खेमचंद जोशी (दोघे रा.जोशी कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
चाकूच्या धाकावर केली लूट
रेल्वेतील सेवानिवृत्त सिनियर सेक्शन इंजिनीयर उत्तमराव नामदेव वाघ (78, द्वारका, नाशिक) यांची लहान मुलगी जळगावातील संत गाडगेबाबा चौकात वास्तव्यास आहेत. उत्तमराव वाघ हे शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता जळगावात रेल्वेने आले. मुलीच्या घरी जाण्यासाठी ते रीक्षाने बसले. रीक्षात आगोदर दोन जण बसले असतानाच इच्छादेवी चौक, डी-मार्ट पाईंटवरून रीक्षा चालकाने संत गाडगेबाबा चौक न जाता थेट मेहरूण तलावाजवळील एका गल्लीतील अंधारात रीक्षा नेली व त्यावेळी तीन जणांनी अचानक उत्तमराव वाघ यांच्या मानेला चाकू लावून खिश्यातील चार हजारांची रोकड आणि 12 हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून पळ काढला. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आठवडे बाजारातून आवळल्या मुसक्या
गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या गोपनिय माहितीनुसार पोलीस कर्मचार्यांनी आकाश उर्फ चोक्या अरुण जोशी आणि लक्ष्मण उर्फ चिंट्या खेमचंद जोशी (दोघे रा. जोशी कॉलनी, जळगाव) यांना आठवडे बाजारातून रविवारी दुपारी अटक केली.
