Big News : Shiv Sena now in alliance with Sambhaji Brigade मोठी बातमी : शिवसेनेची आता संभाजी ब्रिगेडसोबत युती
Big News : Shiv Sena now in alliance with Sambhaji Brigade मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका संभाजी ब्रिगेडशी युती करून लढणार असल्याची घोषणा केली आहे. मातोश्रीवर शुक्रवारी झालेल्या पत्रकार परीषदेत यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. यावेळी झालेल्या पत्रकार परीषदेत संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली.
देशातील लोकशाहीसह संविधान धोक्यात
संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी घेऊन एकत्र लढण्याचे धोरण अवलंबले आहे. आमची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे. आतादेखील महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे. या देशात क्रांतीची गरज आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवेल, असे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , शिवसेना नेते सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते.

आगामी काळात सत्ता शिवसेनेचीच
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याचा मला आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारीक युती झाली आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले.
प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान
या लढवय्या सहकार्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. न्यायालयातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असेल. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
