शिवसेनेत पेटले राजकारण : कार्यकारीणीत डावललल्याने वरणगावात जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर आंंदोलन
Politics ignited in Shiv Sena : Protest in front of district head’s house in Warangaon due to executive’s resignation वरणगाव : शिवसेनेची भुसावळ तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात निष्ठावंतांना डावलून जे शिवसेनेचे सदस्य देखील नाहीत अशा मर्जीतल्या कार्यकर्त्यांना विविध पदे दिल्याने जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या निवासस्थानासमोर शिवसैनिकांनी मंगळवारी आंदोलन केले.
पक्ष सदस्य नसलेल्यांना मिळाली पदे
सध्या शिवसेनेत ठाकरे गट व शिंदे गट असा संघर्ष राज्यात सुरू आहे. शिवसैनिक अद्यापही ठाकरेंच्या शिवसेना पक्षात आहेत तर काही सोडून गेले. शिवसेनेची तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात निष्ठावंतांना डावलत ज्यांचा पक्षाशी संबंधही नाही तसेच सदस्यही नाही त्यांचा समावेश केला आहे. तसेच पक्षाच्या विरोधात लढून निवडणुकीत पराभूत झालेले विरोधक व जिल्हाप्रमुख महाजन यांच्या मर्जीतील, कार्यकर्त्यांना विविध पदे देण्यात आली.

घोषणाबाजी करीत आंदोलन
पदे न मिळालेल्या व नाराज झालेल्या दीपक धांडे, बबलू बर्हाटे, निर्मल दायमा, जंगू खराटे, शरद जैस्वाल, नीलेश महाजन, हेमंत बर्हाटे, सूरज पाटील, चेतन नाईक, धीरज सोनवणे, पवन भोळे, मनोज पवार, मेहमूद भाई, शांताराम भोई, चेतन भोई, गोकूळ बावस्कर, नितीन देशमुख आदी कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी समाधान महाजनांच्या निवासस्थानाबाहेर घोषणा देत आंदोलन सुरू केले.
जिल्हाप्रमुखांनी केली चर्चा
जिल्हाप्रमुख महाजन काही कारणामुळे बाहेरगावी गेले होते. ते आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तुमचे म्हणणे लेखी स्वरूपात द्या, वरिष्ठांना कळवतो असे सांगितले. यावर कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. वरिष्ठांना भेटण्याच्या तयारीने ते माघारी परतले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार आडसुळ, उपनिरीक्षक परशुराम दळवी, हवालदार राहुल येवले व सहकार्यांनी बंदोबस्त ठेवला. पदाधिकारी विलास मुळे, संतोष माळी, हिप्पी शेख, सईद शेख आदी उपस्थित होते.
ते कट्टर शिवसैनिक नाही, पक्षाचा प्रोटोकॉल मोडला
भुसावळ शहर व तालुका कार्यकारिणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर केली आहे. तरीही नाराज झालेल्या शिवसैनिकांनी माझ्या घरासमोर आंदोलन व घोषणाबाजी करून पक्षाचा प्रोटोकॉल मोडला आहे. यापूर्वीही त्यांनीच भुसावळ तालुक्यात गटातटाचे राजकारण केले. हे कट्टर शिवसैनिक नाहीत. त्यांचे आजचे आंदोलन वेगळ्या हेतून होते, असे जिल्हाप्रमुख समाधान महाजन म्हणाले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार
निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे खच्चीकरण करणे व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मर्जीतील कार्यकर्त्यांचा समावेश केला. भुसावळ तालुक्यात लेवा पाटीदार समाज बहुसंख्य असताना यांनी त्यांच्याकडील तालुकाप्रमुख, शहरप्रमुख ही पदे काढून घेतली. यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकतो. याबाबत महाजन यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यांच्याकडून समर्पक उत्तर न मिळाल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे माजी शहरप्रमुख बबलू बर्हाटे म्हणाले.
