भुसावळात निकृष्ट खडका रोडच्या चौकशीसाठी आम आदमी पार्टीचे लाक्षणिक उपोषण
मागण्यांच्या पूर्ततेसाठी पालिका प्रशासनासोबत चर्चा
Symbolic fast of Aam Aadmi Party for inquiry into degraded Khadka Road in Bhusawal भुसावळ : शहरातील खडकारोडच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून रस्ते तात्काळ दुरुस्त करावे, पालिकेच्या जिर्ण ऊर्दू शाळेची डागडूजी करावी, नाल्याची संरक्षण भिंत बांधावी आदींसह विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीतर्फे मंगळवारी लाक्षणिक उपोषण करुन पालिका प्रशासनाला निवेदन दिले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
लाक्षणिक उपोषणाला खडका रोड परिसरातील व्यापारांनीही पाठिंबा दर्शवला. जोपर्यंत नगरपालिकेच्या वतीने मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.

रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप
शहरातील खडका रोड चे निकृष्ट दर्जाचे काम झाले. त्यामुळे तो पावसात अनेक ठिकाणी खराब झाला आहे. त्याची चौकशी करून दुरूस्ती करावी, खडका रोड वरील उर्दू शाळेच्या इमारत जिर्ण झाली असून विद्यार्थी व शिक्षकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच मिल्लत नगर मध्ये नाल्याची पडदी व संरक्षक भिंत बांधणे या कामांसाठी आम आदमी पार्टीचे प्रदेश सहसचिव दिलीप सुरवाडे,भुसावळ तालुका संयोजक प्रमोद पाटील, रावेरचे युवराज महाजन, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष ईशारद खान आदींसह पदाधिकार्यांनी लाक्षणिक उपोषण केले.
पालिकेबाहेर निदर्शने
पालिकेने या कामांकडे लक्ष देण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात परिसरातील व्यापारी, दुकानदारांनीही सहभाग नोंदवला. आम आदमी पार्टीतर्फे ही कामे पूर्ण होत नाही, तोपर्यंत लढा कायम राहिल, असे यावेळी दिलीप सुरवाडे यांनी सांगितले. पालिका प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देवून चर्चा करण्यात आली. यावेळी युवा शहर प्रमुख करण लखन, युवा सचिव जितेश कछवे, सलमान तडवी, अनिल टाक आदींसह पदाधिकारी व व्यापारी, दुकानदार उपस्थित होते.
