बोदवड सिंचन योजना टप्पा-1 चा प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेंतर्गत समावेश

केंद्रातर्फे मिळणार रु.536.64 कोटी ; खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश


मुक्ताईनगर : तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या बोदवड परीसर सिंचन योजनेच्या टप्पा एकचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेंतर्गत वेगवर्धित सिंचन योजनेत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी केली तसेच केंद्रात सुद्धा याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. दरम्यान, नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे सचिव, केंद्र जल आयोग अध्यक्ष, निती आयोग प्रतिनिधी व जलसंपदा मंत्रालय सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या केंद्र शासनाच्या छाननी समितीच्या तिसर्‍या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला.

2141.19 कोटी योजनेच्या टप्पा एकची किंमत
योजनेच्या टप्पा एकची एकूण किंमत रु.2141.19 कोटी असुन कामपित्यार्थ किंमत रु.1923.81 कोटी एवढी आहे. केंद्र सरकार तर्फे मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार या कामाची उर्वरित किंमत 1079.99 कोटी असून त्यापैकी रुपये 536.64 कोटी येत्या तीन वर्षात केंद्र शासनामार्फत प्राप्त होणार आहे. उर्वरीत 543.35 कोटी राज्य शासन देणार आहे. बोदवड परीसर सिंचन योजनेचा प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेंतर्गत वेगवर्धित सिंचन योजनेत समावेश झाल्याने या टप्प्यांतर्गत विदर्भातील 6167 हेक्टर व अवर्षण प्रणव भागातील 9507 हेक्टर तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील 6546 हेक्टर अशी बुलडाणा जिल्ह्यातील 13743 हेक्टर व जळगाव जिल्ह्यातील 8477 हेक्टर अशी एकूण 22220 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा फायदा मिळेल.

यांची बैठकीला उपस्थिती
नवी दिल्ली येथील केंद्र शासनाच्या छाननी समितीच्या तिसर्‍या बैठकीस केंद्रीय जलशक्ती मंत्रालय सचिव, केंद्र जल आयोग अध्यक्ष, निती आयोग प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्रालय सचिव राजपूत, कपाले, तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक मांदाडे, मुख्य अभियंता बोरकर, अधीक्षक अभियंता भदाणे, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !