जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबन होणार : आयजी बी.जी.शेखर पाटील
एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य भोवले : तक्रारीची गांभीर्याने दखल
जळगाव : पोलिस कर्मचार्याशी बोलताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह व अश्लील भाषा वापरत वक्तव्य केले होते. याचे पडसाद बुधवारी उमटल्यानंतर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून बकाले यांना निलंबीत करावे अन्यथा मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला होता. याची दखल घेत नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर-पाटील रात्रीतून बकाले यांचे निलंबन आदेश काढणार असल्याची माहिती दिली आहे. या संदर्भात बकाले यांच्या निलंबनाचे आश्वासन आमदार चव्हाण यांना दिले असून खातेनिहाय चौकशीचेही आश्वासन दिले आहे.
आमदारांनी केली होती निलंबनाची मागणी
आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह व अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली असून बडतर्फ करण्याचीही आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. मागणी मान्य न झाल्यास मराठा समाजाचा महामोर्चा काढण्याचा ईशारा दिला होता. याची गंभीर दखल घेत नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी आ. चव्हाण यांच्यासोबत संवाद साधत बकाले यांचे बुधवारी रात्रीतून निलंबनाचे आदेश काढून डीई (खाते निघाय चौकशी) लावतो असे आश्वासन दिले आहे. आयजी बीजी शेखर यांच्याशी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ प्रतिनिधीने संपर्क साधला मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगून थोड्याच वेळात निलंबन आदेश निघणार असल्याची माहिती दिली.

या प्रवृत्ती तर जातीवादाला खतपाणी
ऑडिओ क्लिप अतिशय आक्षेपार्ह्य असून अशी प्रवृत्ती पोलीस प्रशासनात राहणे म्हणजे जातीयवादाला खतपाणी घालणे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही दोन समाजात सामंजस्य राखणे माझी जवाबदारी आहे. सदर आक्षेपार्ह्य ऑडिओ क्लिप समाजात प्रसारीत झाल्यानंतर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाजात उमटतील याची जाणीव पोलीस दलाने ठेवावी. सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांचे तत्काळ निलंबन करावे. तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा येणार्या काळात असंतोष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णपणे पोलीस दल जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असा थेट ईशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाला दिला होता. त्यामुळे पोलीस दलाने तातडीने पावले उचलत आमदार चव्हाण यांना कारवाईचे आश्वासन दिले आहे.
