भुसावळात 43 वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी : के.नारखेडेत रंगला स्नेहसंमेलन सोहळा


भुसावळ : शहरातील के.नारखेडे विद्यालयातील इ.स. 1979 एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा नुकतेच 8 जानेवारी 2023 रोजी तापी नदी तीरावरील रेणुका माता मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा झाले. के.नारखेडे विद्यालयातून इ.स. 1979 मध्ये एसएससी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा हा आठवा स्नेहसंमेलन मेळावा होता. या मेळाव्यास एकूण 78 जणांनी उपस्थिती नोंदवली.

यंदा उपक्रमाचे आठवे वर्ष
या बॅचचे विशेष म्हणजे 2013 पासून कोरोना कालावधी वगळता हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सतत सुरू आहे. यापूर्वी हे स्नेहसंमेलन 3 वेळेस भुसावळ, 2 वेळेस मुंबई,1 वेळेस पुणे व 1 वेळेस नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. स्नेहसंमेलन मेळाव्यास भुसावळ, मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, खामगाव,इंदोर व बर्‍हाणपूर येथून मित्र-मैत्रिणींनी सहकुटुंब हजेरी लावली.

सेवानिवृत्त मित्रांचा केला सन्मान
सुरुवातीला सर्वांनी रजिस्टर मध्ये आपले नाव,पत्ता व फोन नंबर याची नोंद करुन मंदिर परिसरातील देवतांचे दर्शन घेऊन नंतर अल्पोपहार घेतला. सकाळी ठीक 10 वाजता दीपप्रज्वलन,सरस्वती पूजन झाल्यावर सौ. ज्योती बोरकर यांनी सरस्वती वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व मित्र-मैत्रिणींनी शालेय प्रार्थना म्हणून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच दिवंगत मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली वाहिली. नव्याने प्रथमतः स्नेहसंमेलनास उपस्थित झालेल्या मित्रांचा परिचय करून देण्यात आला. सेवानिवृत्त झालेल्या मित्रांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सेवेत असतांनाच्या आठवणी व सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य यावर सुनील पाटील व अनिल जोशी व इतर काही मित्रांनी मनोगत व्यक्त केले. तसेच वैशाली चौधरी व प्रा. डॉ. सुरेश वाकचौरे यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. चंद्रकांत बागुल यांनी स्वरचित बहारदार गोंधळ सादर केला त्यात देवी देवतांना आवाहन करीत गुरु व सर्व मित्रांना यापुढे देखील स्नेहसंमेलनात मोठ्या संख्येने सहभाग घेण्यासाठी आवाहन केले. सौ.स्नेहा चासकर यांनी तुझ्या गळा माझ्या गळा’ या गीताचे औषधीवर आधारित विडंबनात्मक गाणे तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या हे सादर करून सर्वांना हसवले. दुपारी 1ते 3 या वेळेत सर्वांनी खानदेशातील प्रसिद्ध मेनू भरीत-पुरीचा मनसोक्त आस्वाद घेतला व गप्पा टप्पा केल्या.

जड अंतकरणाने दिला मित्रांना निरोप
जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यावर काही मित्र-मैत्रिणींनी तापी काठच्या निसर्गरम्य वातावरणात फेरफटका मारून सेल्फी घेतल्या. जमलेल्या सर्वांनी रेणुका माता मंदिर,परिसर, प्रशस्त असा सभागृह व स्वच्छता यांची खूप प्रशंसा केली. दुपारच्या सत्रात ग्रुप फोटोचा कार्यक्रम व विविध खेळ घेण्यात आले. प्रसंगी सर्व मित्रांसोबत आलेल्या कुटुंबियांनी कार्यक्रमाचा मनसोक्त व मनमुराद आनंद लुटला. सरते शेवटी वियोगाची वेळ जवळ आल्यावर कुणालाही एकमेकाला सोडून जावं असं वाटत नव्हतं, मात्र साश्रुनयनांनीं जड अंतकरणाने पुन्हा भेटू असे आश्वासन घेत मित्र-मैत्रिणी व त्यांच्यासोबत आलेले कुटुंबीय यांनी निरोप घेतला. सूत्रसंचलन वैशाली चौधरी यांनी केले. सुनील पाटील यांनी रेणुका माता मंदिराचे सर्व विश्वस्त, पुजारी,कर्मचारी तसेच येवले केटरर्स यांचे आभार मानले व भुसावळ टीमचे मनापासून कौतुक केले. यशस्वीतेसाठी प्रदीप राणे. अनिल जोशी व अनिल जावळे यांचेसह भुसावळ येथे राहणार्‍या टीमच्या सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !