विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही : उमेश महाराज दशरथे
फैजपूर : काला म्हणजे प्रसाद, संसार करून पदरात पश्चाताप पडतो मात्र परमार्थाचा समारोप प्रसादात होत असतो. उत्तर भारतातील महात्म्यांनी रासलीलेला अत्यंतिक महत्त्व दिले असून दक्षिण भारतातल्या संतांनी काल्याला महत्त्व दिल आहे. धाम अवतार, देव अवतार, नाम अवतार व लीला अवतार असे चार परम सत्यतत्वे आहेत. जीवन जगत असताना खरंतर आपला शत्रू कोण ? या प्रश्नाचे उत्तर हरि कथे ते धिक्कारी शत्रू माझा तोच वैरी अशा अर्थाने दिला जातो. आपण हरिनाम चिंतनात इतके व्यस्त असावे की, अवगुण करण्याकरता आपल्याकडे वेळच असू नये. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असे मार्मिक प्रतिपादन याप्रसंगी नथूसिंग बाबा राजपूत दौरा मंडळ सप्ताह आयोजित सामूहिक विठ्ठल नामजप व नाम संकीर्तन महोत्सवात काल्याच्या कीर्तनप्रसंगी उमेश महाराज दशरथे यांनी केले.
दुसर्याला श्रेय देणं हे मोठ्या माणसाचे लक्षण
यशोदा माता तीच जीला दुसर्याला मोठेपणा देता येतो आणि म्हणून मोठ्या माणसाचं लक्षण असतं ते श्रेय दुसर्याला देतात. संसारात कुठलीही गोष्ट सोशल्याशिवाय मिळत नाही. तर देव शरीराचे सौंदर्य पाहत नाही मनाचं सौंदर्य पाहतो आणि म्हणूनच नामजपाने मनाचे सौंदर्य वाढवा, असा उपदेश उमेश महाराज यांनी केला. वारकरी सांप्रदायाला टिकवणे व वृद्धिंगत करण्यासाठी नामचिंतन आपल्या अंतिम श्वासापर्यंत टिकून ठेवण्याची अत्यंत गरज आहे आणि विशेष म्हणजे फैजपूर येथील महोत्सवाचे आयोजक व उपस्थित भक्तगणांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. विशेषतः महिला वर्गांचे कारण जरी त्यांच्या अंगावर दहा ते पंधरा हजाराची साडी नसली तरी काही हरकत नाही परंतु लाख मोलाची भगवतगीतेची वचने मुखावरती आहेत यापेक्षा श्रेष्ठत्व ते काय…! अशा शब्दात उमेश महाराज दशरथे यांनी धर्म मंडपातील पुरुष व महिलांचे अभिनंदन केले.


नामसंकीर्तन महोत्सव यापुढेही असाच तेवत राहणार
याप्रसंगी महोत्सवाचे आयोजन समितीचे नरेंद्र नारखेडे यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सहभागी असणार्या सर्वच घटकातील ज्येष्ठ, श्रेष्ठ मान्यवर कार्यकर्ते, भक्तगण यांचे आभार व्यक्त करीत नामजप व नामसंकीर्तन महोत्सवाचा यज्ञ यापुढेही असाच तेवत राहील, असे आश्वासन यावेळी दिले.
