भारतीय संविधानाने दिलेली स्त्री पुरुष समता आपल्या जगण्यात यायला हवी : दर्शना पवार


भालोद : निसर्गाने केवळ लिंग रचनेत मानवात फरक केला आहे. या पलीकडे स्त्री -पुरुषात फरक केलेला नाही. परंतु समाजातील अंधश्रद्धाळू व अविवेकी प्रवृत्तीनी श्रेष्ठ कनिष्ठतेच्या भिंती उभारून सामाजिक समतोल बिघडविण्याचेच कार्य केले. समाजातील स्त्रियांसह सर्व वर्गाचे शोषण बंद करण्याचे ऐतिहासिक कार्य भारतीय संविधानाने केले आहे. संविधानातील सर्व प्रकारची समता म्हणजेच विषमतेला नकार व समतेला होकार आहे. ही समता आमच्या जगण्यात कृतीने यावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध समाजसेविका दर्शना पवार (अमळनेर ) यांनी केले. भालोद महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, ग्रंथालय विभाग, व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लैंगिक अत्याचार व हिंसा या विषयावरील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रा.डॉ.वर्षा नेहेते होते. प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ येथील स्त्री चळवळीत कार्य करणार्‍या नम्रपाली गोंडाणे, पूनम प्रधान, शैला सावंत आदी मान्यवर होत्या.

सत्य पटले तरच स्वीकारा
दर्शना पवार यांनी हसत खेळत स्त्रियांना पुरुष प्रधान व्यवस्थेचे समर्थक गुलाम कसे बनवितात. त्यांचे शोषण कसे करतात व स्त्रियादेखील या आंधळ्या व्यवस्थेच्या गुलाम कशा बनतात याची अनेक उदाहरणे देऊन सामाजिक प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. जीवनातील प्रत्येक गोष्ट स्वीकारतांना ती विवेक जागृत ठेऊन विचार पूर्वक स्वीकारा. कुणी तरी मोठा माणूस सांगतो म्हणून ती खरी आहे, असे समजू नका. त्यातील सत्य तुमच्या बुद्धीला पटले तरच ती गोष्ट स्वीकारा. आंधळ्या पद्धतीने स्वीकारलेली गोष्ट स्वतः सह समाजाचे नुकसान करणारी असते….! स्त्री किंवा समाजातील लिंगभेद असलेल्या व्यक्ती माणूस आहेत. त्यांच्या माणूस पणाचे अधिकार आपण जर या घटकांना दिलेत तर समाजात लैंगिक आत्याचार आणि हिंसा होणार नाही. त्यासाठी या घटकाकडे सहानुभूतीने नं बघता माणूस पणे बघा असे आवाहन उपस्थितांना त्यांनी केले. नम्रपाली गोंडाणे यांनी ही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक प्रा.डॉ.पी.ए.सावळे तर आभार प्रा.डॉ.दिनेश पाटील यांनी मानले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा.डॉ.जतीन मेढे, ग्रंथालय विभागाचे डॉ.दिगंबर खोब्रागडे, राष्ट्रीय सेवा योजना एककाचे प्रा.डॉ.पी.ए.सावळे, प्रा.मुकेश चौधरी, प्रा.डॉ.मीनाक्षी राणे, प.डॉ.दिनेश पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री सोनवणे या विद्यार्थिनीने केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !