भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती
वरणगाव बाजार समिती भुसावळला होणार अटॅच : पणन सहसचिवांचे आदेश
Election of Bhusawal Agricultural Produce Market Committee postponed भुसावळ : भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आखाडा पेटला असतानाच आता या निवडणुकीला स्थगिती मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बोदवडला संलग्न असलेली वरणगाव उपबाजार समिती भुसावळ बाजार समितीला संलग्न करावी, असे आदेश राज्याचे पणन सहसचिव डॉ.सुग्रीव सं.धपाटे यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांना 6 एप्रिल रोजी दिले आहेत. शिवाय राज्यातील दोन बाजार समित्यांचे विभाजन करण्यासह एक बाजार समितीचे विलीनीकरण करण्याचे आदेशही धपाटे यांनी काढले आहेत.
भुसावळात निवडणूक लांबण्याची चिन्हे
भुसावळात राजकीय आखाडा तापला असतानाच दोन दिवसांपूर्वी अर्जांची छाननी होवून मतदार यादीदेखील प्रसिद्ध झाली मात्र आता बोदवडमधून वरणगाव उपबाजार समितीचे विभाजन करून ती भुसावळला संलग्न करण्याबाबत पणन सहसचिवांनी आदेश काढल्यानंतर भुसावळातील निवडणूक काही महिने निश्चितपणे लांबणार आहेत.

कृउबा विभाजनासह संलग्न करण्याचे आदेश
सूत्रांच्या माहितीनुसार, खुलताबाद बाजार समितीचे लासूर स्टेशन बाजार समितीत विलीनीकरण, कुंटूर, ता.नायगाव कृउबाचे नायगाव बाजार समितीत विलीनीकरण, कृउबा आष्टी, ता.वर्धाचे विभाजन करून कारंजा येथे स्वतंत्र बाजार समिती स्थापन करणे तसेच बोदवड कृउबामधून वरणगावचे विभाजन करून ती भुसावळ बाजार समितीत समाविष्ट करण्याचे आदेश पणन सहसचिवांनी काढले आहेत.
