भुसावळ तालुक्यात शेत रस्ते टाकणार कात

आमदारांचा पाठपुरावा : मातोश्री योजनेतून 54 किलोमीटर रस्त्यांची कामे होणार


Farm roads will be built in Bhusawal taluka भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर भुसावळ तालुक्यात 54 किलोमीटर अंतराच्या शेती रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मातोश्री ग्रामसमृध्दी शेत, पाणंद रस्ते योजनेतंर्गत ही कामे केली जाणार आहे. भुसावळ तालुक्यातील 23 गावांमध्ये 54 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची कामे होणार आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखड्यात भुसावळ तालुक्यातील 54 किलोमीटर अंतराच्या पाणंद रस्त्यांना राज्य शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आमदारांनी ‘दैनिक तरुण भारत’शी बोलताना दिली. दरम्यान, शेती रस्त्यांची कामे होणार असून शेतकर्‍यांना शेती माल आता शहरापर्यंत आणताना होणारी कसरत टळणार असून शेतकर्‍यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

अशी होणार रस्त्यांची कामे
भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे शिवारात दोन, कठोरा खुर्द शिवारात चार, कठोरा बुद्रूक दोन, कन्हाळे खुर्द दोन, कन्हाळे बुद्रूक चार, आचेगाव दोन, काहूरखेडा एक, कुर्‍हे पानाचे तीन, खंडाळे एक, गोजोरे चार, जाडगाव एक, टळाकळी शिवारात सहा, तळवेल तीन, पिंपळगाव व निंभोरा शिवारात एक, मन्यारखेडा शिवारात दोन, वराडसीम शिवारात दोन, वराडसीम शिवारात एक, शिंदी शिवारात दोन, साकरी शिवारात तीन, साकेगाव शिवारात एक, सावतर व सुनसगाव शिवारात तीन तर हतनूर शिवारात दोन असे एकूण 54 किलोमीटर अंतराचे रस्ते होणार आहे. रस्त्यांच्या कामांमुळे शेतकर्‍यांचे पावसाळ्यात होणारे हाल थांबणार असून शेती माल सहज बाजारपेठेत आणणे सुलभ होणार असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार संजय सावकारे म्हणाले की, या रस्त्यांच्या कामामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असून पावसाळ्यात आता शेतकर्‍यांचे हाल थांबणार असून आता पावसाळ्यात काम होणार नसलेतरी उन्हाळ्यात कामे पूर्ण होतील, असेही आमदार म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !