कांद्याला कवडीमोल भाव : भुसावळ तालुक्यातील शेतकर्यांनी कांदा पिकात फिरवल्या मेंढ्यांसह बकर्या
वांजोळा शिवारातील प्रकार : उत्पन्नाइतका खर्चही न निघाल्याने संताप
Bargain value for onion: Farmers of Bhusawal taluka rotate sheep and goats in onion crop. भुसावळ : कांदा लागवडीतून आर्थिक स्थिती सुधारेल या आशेने भुसावळ तालुक्यातील वांजोळा परीसरात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याची लागवड केली मात्र कांद्याचे भाव गडगडल्याने खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नसल्याने शेतकर्यांनी शुक्रवार, 19 मे रोजी कांद्यात थेट गुरे-ढोरे व मेंढ्या सोडून आपला संताप व्यक्त केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. शासनाने कांद्याला तीनशे रुपयांचे अनुदान दिले असलेतरी लाभ मिळण्याबाबत जाचक अटी असल्याचा आरोपही शेतकर्यांनी केला आहे.
कांदा उत्पादक शेतकरी हतबल
वांजोळा परीसरातील अनेक शेतकर्यांनी उन्हाळी कांद्याचे पीक घेतले मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा आल्याने भाव कोसळले असून मजुरीचा खर्चही निघत नसल्याने काही शेतकर्यांनी शेतात रोटाव्हेटर फिरवला तर वांजोळा येथील शेतकरी किशोर देवराम सावळे यांनी चार एकर बागायती शेतात तर किरण भास्कर नेमाडे यांनीही शुक्रवारी आपल्या शेतात मेंढ्यासह गुरे सोडून संताप व्यक्त केला. दोघा शेतकर्यांची वांजोळा शिवारात शेती आहे. यापूर्वी कापसाला जादा भाव मिळेल म्हणून शेतकर्यांनी कापूस साठवून ठेवला मात्र कापसाने निराशा केल्यानंतर कांद्याकडून अपेक्षा होती मात्र ती ही फोल ठरली आहे. यापूर्वी काही शेतकर्यांनी कांद्याच्या शेतात रोटोव्हेटर फिरवल्याचेही सांगण्यात आले.
खर्चाइतकाही भाव मिळत नसल्याने संताप
शेतकरी किशोर सावळे यांच्या माहितीनुसार, चार एकर शेतात कांदा लागवड केली मात्र कांदा लागवडीपासून तर आता कांदा काढणीच्या मजुरीचा खर्च एक लाख रुपये आला मात्र प्रत्यक्षात हाती आलेल्या कांद्याला निम्मे अर्थात 50 हजार रुपयेही भाव मिळत नसल्याने त्यांनी गुरा-ढोरांसह मेंढ्यांना सोडून त्यांचा आत्मा तृप्त केला. अलीकडे झालेल्या गारपीटीत मक्यासह कांद्याचे नुकसान झाले, मायबाप सरकारने पंचनाम्याचे सोपस्कार केले मात्र भरपाईचा छदामही न दिल्याने संतापात कांदे प्राण्यांच्या घशात घातल्याचे सावळे म्हणाले.
