भुसावळातील खंडणी प्रकरण : राजा मोघेला मोबाईल देणार्‍या नाशिकच्या संशयिताविरोधात गुन्हा


Bhusawal extortion case : Case against suspect from Nashik who gave mobile phone to Raja Moghe भुसावळ : शहरातील रवींद्र खरात हत्याकांडातील आरोपी राजा मोघे याने भुसावळ न्यायालयात तारखेवर आल्यानंतर दोन पंटर व भावाच्या माध्यमातून शहरातील दोन व्यापार्‍यांना धमकावत खंडणी मागितली होती. या प्रकरणी मंगळवार, 16 मे रोजी शहर व बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलिसांनी तपासादरम्यान राजा मोघे याने ज्या क्रमांकावरून पंटराशी संवाद साधत व्यापार्‍यांकडे धमकी मागितली त्या क्रमांकाचा शोध लावण्यात यंत्रणेला यश आले असून अनोळखी मोबाईल वापरकर्त्याला खंडणी प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. संशयित मोबाईलधारक नाशिकमधील असून त्याचा शोध घेण्यासाठी भुसावळ शहर पोलिसांचे पथक नाशिकला सोमवारी रवाना झाले आहे.

दुसरा पसार संशयित राजा मोघेचा भाऊ
शहरातील पाच जणांच्या हत्याकांडात राजा मोघेसह पाच संशयित कारागृहात आहेत. मंगळवार, 16 मे रोजी राजा मोघेसह अन्य चौघांना भुसावळात न्यायालयात तारखेवर आणण्यात आले होते मात्र न्यायालयीन कोर्ट कचेरीच्या कामासाठी पैसे नसल्याने राजा मोघेने आपल्या दोन हस्तक व भावाच्या माध्यमातून दोन व्यापार्‍यांना धमकावत 30 हजारांची खंडणी मागितली होती. गुजराथी स्वीट मार्टचे कपिल गुजराथी व गोपी मॉलचे संचालक रवीकुमार झामनानी यांनी या प्रकरणी हिंमत दाखवून अनुक्रमे शहर व बाजारपेठ पोलिसात मंगळवारीच गुन्हा दाखल केल्यानंतर सुरुवातीला संशयित रीतीक उर्फ गोलू भगवान निदाने (22, नॉर्थ कॉलनी, भुसावळ) यास भुसावळातून तर योगेश उर्फ सोनू हिरालाल मोघे (28, रा. आगवाली चाळ, ह.मु. हिरावाडी, नाशिक) यास जळगावातून अटक केली होती. विशेष म्हणजे रीतीकसोबत व्यापार्‍यांकडे खंडणी मागणीसाठी गेलेला व सध्या पसार असलेला संशयित राजा मोघेचा भाऊ पापा मोघे असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांनी दिली.

खंडणी प्रकरणातील आरोपींची संख्या झाली पाच
शहरातील व्यापार्‍यांकडे जावून खंडणी मागणार्‍या संशयित रीतीकचा मोबाईल व दुचाकी पोलिसांनी जप्त केली असलीतरी प्रत्यक्षात खंडणी मागण्यासाठी व राजा मोघे याने ज्या मोबाईलवरून संभाषण साधले तो मोबाईल गुन्ह्यात जप्त करणे आवश्यक असल्याने पोलिसांनी त्या क्रमांकाचा सीडीआरद्वारे शोध लावला आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या माहितीनुसार, नाशिकमधील एका संशयिताच्या नावावर हा मोबाईल रजिस्टर असून त्यास खंडणी प्रकरणात आरोपी करण्यात आल्याने गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. खंडणीत संवादासाठी वापरण्यात आलेला मोबाईल नाशिकमधील एकाचा असून संशयिताच्या माहितीसाठी भुसावळ शहर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. दरम्यान, न्यायालयीन तारखेवर आलेल्या आरोपीने थेट धमकावून व्यापार्‍यांना खंडणी मागितल्याने आरोपीला भुसावळात आणणार्‍या पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !