भुसावळतील खंडणी प्रकरण : राजा मोघेला मोबाईल देणार्‍या पोलिसांवरही होणार कारवाई !


भुसावळ : शहरातील रवींद्र खरात हत्याकांडातील आरोपी राजा मोघे याने भुसावळ सत्र न्यायालयात तारखेवर आल्यानंतर भावासह पंटरच्या माध्यमातून शहरातील दोन व्यापार्‍यांना धमकावत खंडणी मागितली होती. या प्रकरणी मंगळवार, 16 मे रोजी शहर व बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी राजा मोघेला मोबाईल देणार्‍या क्रमांकाचा शोध लावला असून अज्ञात मोबाईल धारकाला खंडणी प्रकरणात आरोपी केले आहे. दरम्यान, राजा मोघेला मोबाईल देणारा संशयित नाशिकमधील पोलीस हवालदार असल्याचा यंत्रणेला संशय असून त्यास या गुन्ह्यात लवकरच संशयित आरोपी केले जाणार आहे शिवाय या पोलिसाला अन्य कैदी पार्टीने सहकार्य केले असल्यास वा त्यांचा गुन्ह्यात सहभाग दिसून आल्यास त्यांनाही आरोपी करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. भुसावळ शहर पोलिसांनी राजा मोघेला भुसावळात आणताना कोण पोलीस भुसावळात आले ? आतापर्यंत तारखेवर आणताना कोण पोलीस होते ? याबाबतची माहिती नाशिक पोलीस आयुक्तालयासह नाशिक जेल पोलीस प्रशासनाला पत्राद्वारे मागितली आहे.

कैदी पार्टीच्या वाढल्या अडचणी
हत्याकांडातील आरोपी राजा मोघे याने आपला हस्तक रीतीक उर्फ गोलू भगवान निदाने (22, नॉर्थ कॉलनी, भुसावळ) व भाऊ पापा मोघे यांना शहरातील गोपी मॉलचे रवी झामनानी व गुजराथी स्वीटचे कपिल शर्मा यांच्याकडे पाठवत धमकावून खंडणी मागितली होती. या प्रकरणी शहर व बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर रीतीकसह राजा मोघेचा भाऊ योगेश मोघेला अटक करण्यात आली तर पापा मोघे अद्यापही पसार आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी राजा मोघेला मंगळवारी भुसावळात आणल्यानंतर खंडणी प्रकरण घडल्याने पोलीस प्रशासनही आरोपीच्या पिंजर्‍यात सापडले होते. या गंभीर प्रकाराची पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दखल घेत भुसावळ शहर पोलिसांनी नाशिक पोलीस आयुक्तालयासह नाशिक जेल प्रशासनाला मंगळवारी पत्र देवून भुसावळ आलेल्या कैदी पार्टीबाबत विचारणा केली आहे.

लवकरच कारवाईची शक्यता
भुसावळात संशयिताला आणणार्‍या एका हवालदाराच्या मोबाईलवरून खंडणी प्रकरणात संभाषण झाल्याची दाट शक्यता असून या क्रमांकाचे सीडीआरदेखील पोलिसांनी काढले असून लवकरच या हवालदारावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !