नायगावातून 40 हजार रुपये किंमतीची बैलजोडी चोरी
यावल : यावल तालुक्यातील नायगाव येथील खळ्यात बांधलेली 40 हजारांची बैल जोडी चोरट्यांनी लांबवली. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पशूधन चोरीने खळबळ
नायगाव ता. यावल या गावात भूषण मुरलीधर पाटील या शेतकर्याने गावालगत असलेले आपल्या खळ्यामध्ये 40हजार रुपये किमतीची आपली बैल जोडी बांधली होती. त्यांना मंगळवारी रात्री चारा-पाणी करून ते रात्री घरी जाऊन झोपले होते. दरम्यान मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या खळ्यात बांधलेली 40 हजार रुपये किमतीची ही बैल जोडी चोरी केली. सदर प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा सर्वत्र शोध घेऊनही बैल जोडी मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र पाटील करीत आहे.
