सातोद गावात वीज चोरी : दंड न भरणार्या तिघांविरोधात गुन्हा
यावल : तालुक्यातील सातोद या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या यावल ग्रामीण कक्षाकडून वीज चोरट्यांविरोधात धडक मोहिम राबवण्यात आली. तीन जणांना वीज चोरी करतांना पकडण्यात आल्याने त्यांना वीज युनिट प्रमाणे दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र त्यांनी दंड न भरल्याने त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दंड न भरल्याने गुन्हा
सातोद, ता.यावल या गावात यावल विद्युत वितरण ग्रामीण कक्षाचे अभियंता दीपक चौधरीसह तंत्रज्ञ योगेश बारी, दीपक भंगाळे, दिलीप कोळी, अनिल कोळी या पथकाने वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवली. यात सातोद गावात मनोज दिनकर पाटील, प्रभाकर शेनफडू तळेले व सविता अरुण धांडे हे तीन जण वीज चोरी करतांना आढळले. या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या विज युनिटनुसार दंड आकारून त्यांना नोटीस देण्यात आली मात्र त्यांनी वेळेत दंड न भरल्याने या तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.
