Sri Sant Muktai Ashadhi Wari palankhi श्री संत मुक्ताई आषाढी वारी पालखीचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान

312 वर्षांची अखंड परंपरा : यंदा पायी वारी 34 ऐवजी 24 दिवसात पोहोचणार : पालखी सोहळ्याची जय्यत तयारी


Sri Sant Muktai Ashadhi Wari palankhi leaving for Pandharpur tomorrow मुक्ताईनगर : खान्देशसह विदर्भ व मराठवाड्यातील हजारो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या मार्गात यंदा 40 वर्षांनंतर बदल करण्यात आल्यानंतर वारकर्‍यांना सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून विविध संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे दर्शन घेण्यासाठी प्रस्थान करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार शेकडो दिंड्या, पालख्या आणि हजारो वारकरी पायी प्रवास करून मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे रवाना होतात. श्री क्षेत्र कोथळीतील संत मुक्ताईच्या समाधीस्थळापासून आषाढी वारी पालखीला पंढरपूरात नेण्याची 312 वर्षांची परंपरा आहे. मुक्ताईंची पालखी आल्याशिवाय इतर कोणत्याही संतांच्या पालखीला पंढरपुरात प्रवेश मिळत नाही हेदेखील विशेष !

यंदा पालखी 34 ऐवजी 24 दिवसात पोहोचणार
दरवर्षी हा सोहळा वैशाख शु. पंचमीला कोथळी (ता.मुक्ताईनगर) येथून निघतो. तब्बल सहा जिल्ह्यांमधून 750 किलोमीटर पायी प्रवास करीत पायी पालखी सोहळा पंढरपूरात दाखल होत होता मात्र यंदा पालखीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था तसेच आडवळणी रस्त्यांमुळे रथ नेण्यात येणार्‍या अडचणी पाहता यंदा पालखी मार्गात काहीसा बदल करण्यात आला आहे. आडमार्गाऐवजी सरळ मार्गाने पालखीचा प्रवास होणार असल्याने
34 दिवसांचा प्रवास अर्थात 750 ऐवजी 600 किलोमीटर अंतर चालावे लागणार आहे. पालखी कुठेही रथाच्या खाली आणि रथ महामार्गाच्या खाली उतरणार नाही.

अष्टमीला पालखी पंढपूरात
कोथळीतून सकाळऐवजी दुपारी पालखीचे प्रस्थान होऊन पालखी नवीन मंदिरात विसावा घेईल. दुसर्‍या दिवशी दसरखेड मार्गे मलकापूरला दुसरा मुक्काम, मोताळा तिसरा व चौथा मुक्काम बुलडाणा येथे होईल. जुन्या नियोजनात पालखी बुलडाण्याला सातव्या दिवशी पोहोचत होती. बुलडाणा येथून येडगाव फाट्यावरून पालखी चिखली (पाचवा मुक्काम) येईल. पूर्वी पालखी एडगावात मुक्कामी असायची तसेच आता भरोसा गावाऐवजी महामार्गावरील भरोसा फाट्यावर सहावा मुक्काम होईल.
नंतर देऊळगाव मही (सातवा), देऊळगाव राजा (आठवा), जालना (नववा), काजळा फाटा (दहावा), अंबड येथे अकरावा मुक्काम होईल. वढी गोद्री व पाथरवाला येथे मुक्काम होणार नाही. त्याऐवजी अंकुशनगरला बारावा मुक्काम होईल. गेवराई (13 वा ), नामलगाव फाटा (14 वा), बीड (15 व 16 वा ), पुढे जुन्या मार्गावरील दोन मुक्काम कमी होतील. त्यामुळे पालखी आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी अष्टमीला पंढपुरात दाखल होईल.

महामार्गालगतच मुक्काम : पालखीचा प्रवास 24 दिवसांचा
महाराष्ट्रातील इतर संतांच्या पालखीप्रमाणे संत मुक्ताई पालखीचा मार्ग निश्चित होऊन त्याचा विकास व्हावा, वारीत सहभागी सुमारे अडीच हजार वारकर्‍यांची गैरसोय टळावी म्हणून मार्गात बदल केला. त्यानुसार 34 ऐवजी 24 दिवसांचा प्रवास होईल. दररोज 20 ते 25 किमी अंतर चालण्याचे नियोजन आहे. मुक्कामाची ठिकाणे महामार्ग लगतची असतील. संत मुक्ताई पालखी 26 जूनला पंढरपुरात दाखल होईल, असे श्री संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !