माझी वसुंधरात सर्वोत्तम कामगिरी : भुसावळ पालिकेचा आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव


भुसावळ : भुसावळ पालिकेने माझी वसुंधरा अभियानात केलेल्या सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर पालिकेचा अमृत शहरांमध्ये समावेश करण्यात आला. या कामगिरीनंतर मुंबईतील जमशेद भाभा थिएटर, नरीमन पॉईंट येथे सोमवार, 5 जून होणार्‍या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, नूतन मुख्याधिकारी महेश वाघमोडे, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता नितीन लुंगे, नितीन देशमुख सर्वोत्तम कामगिरीचे पारीतोषिक स्वीकारतील.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी शहराने केलेल्या या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालयातर्फे हे पारीतोषिक दिले जात आहे. सोमवारी दुपारी चार वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या पारीतोषिकाचे वितरण होईल. पालिकेचे माजी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी आपल्या काळात माझी वसुंधरा अभियानातून शहरात पर्यावरणपुरक कामे केली. दुभाजकांची रंगरंगोटी व निकषांप्रमाणे झालेल्या या कामगिरीमुळे एक ते तीन लाख लोकसंख्येच्या अमृत शहराच्या गटात भुसावळ सर्वोत्तम कामगिरी करणारे शहर ठरले.

पालिकेचे अधिकारी स्वीकारणार पुरस्कार
स्वच्छतेसाठी विशेष लक्ष दिले जात असल्याने आगामी काळात स्वच्छ सर्वेक्षणातही शहर दमदार कामगिरी बजावू शकेल, असा विश्वास या पारीतोषिकामुळे वाढला आहे. नगरपरीषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, नवनियुक्त मुख्याधिकारी महेश वाघमोडे, तत्कालीन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व माझी वसुंधरा अभियानात काम करणारे अधिकारी आदी हा पुरस्कार स्विकारतील. सदर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण माझी वसुंधरा या फेसबुक पेजवर होणार असून शहरवासीयांनी या थेट कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !