दानापूर एक्स्प्रेसमधील चिमुकल्यांचा दोन दिवसात पालकांना ताबा : जिल्हाधिकारी अमन मित्तल


Children in Danapur Express are in custody of their parents in two days: Collector Aman Mittal भुसावळ : 01040 दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याच्या तक्रारीनंतर भुसावळात रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी भुसावळात 29 तर मनमाडमध्ये 30 मुलांची सुटका केली होती. मानवी तस्करीच्या कलमान्वये या प्रकरणी गुन्हा दाखल होवून पाच संशयितांना अटक करण्यात आली. भुसावळात अटक करण्यात आलेल्या मौलाना मोहम्मद अंजर आलम मोहम्मद सैय्यद अली (44, डूबा, जोकिहाट, अररीया, बिहार, ह.मु.पेठभाग वालवा, काझी गल्ली, काझी मशीद, आस्ठा, जि.सांगली) यास सुरूवातीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती तर कोठडी संपल्यानंतर संशयितास भुसावळ रेल्वे न्यायालयात सोमवारी हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, दोन दिवसात चिमुकल्यांना पुन्हा बिहारातील बालकल्याण समितीकडे सोपवण्यात येणार असून त्यानंतर पालकांना त्यांचा ताबा मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

तस्करीचा गुन्हा खोटा :  आरोपीच्या वकीलांचा दावा
संशयित मोहम्मद अंजर आलम यास भुसावळ लोहमार्ग न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकील अ‍ॅड.नवाब अहमद यांनी युक्तीवादात सांगितले की, संशयित 2013 पासून मुलांना मदरशामध्ये नेत असून या प्रकरणात सखोल चौकशी करायची आहे, त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, उडवा-उडवीची उत्तरे तो देत आहेत, प्रत्येक पालकाडून त्याने तिकीटा व्यक्तिरीक्त एक हजार रुपये घेतले असून त्याच्याकडे कारवाईदरम्यान ही रक्कम आढळली नसल्याने ती कुठे खर्च केली शिवाय अनेक मुलांच्या जन्मतारखा एकसारख्या असून त्याबाबत अधिक तपास करावयाचा असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी तर संशयित आरोपीच्या वकीलांनी मात्र ही मानवी तस्करी नसल्याचे ठासून सांगून संबंधित मुले रीझर्व्ह तिकीटावरून दानापूर एक्स्प्रेसमध्ये शिक्षणार्थ मदरसामध्ये निघाली होती होती शिवाय या मुलांची वा त्यांच्या पालकांची कुठलीही तक्रार नाही, मुलांच्या पालकांनी यंत्रणेला स्वखुशीने मुलांना मदरशामध्ये शिक्षणार्थ पाठवत असल्याचे लिहून दिल्याने पुन्हा पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. संशयित आरोपीतर्फे अ‍ॅड.फिरोज शेख, अ‍ॅड.एहतेश्याम मलिक, अ‍ॅड.ईस्माईल शेख, अ‍ॅड.वसीम खान, अ‍ॅड.मिर्झा आलम यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने संशयित मौलाना मोहम्मद अंजर आलम मोहम्मद सैय्यद अली (44, डूबा, जोकिहाट, अररीया, बिहार, ह.मु.पेठभाग वालवा, काझी गल्ली, काझी मशीद, आस्ठा, जि.सांगली) यास न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, भुसावळ सत्र न्यायालयात संशयिताच्या जामिनाबाबत मंगळवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.





बालकांना पालकांच्या ताब्यात देणार : जिल्हाधिकारी
तस्करीच्या संशयावरून भुसावळात सुटका करण्यात आलेल्या 29 बालकांची सध्या जळगाव बालनिरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे. बालकल्याण समितीनेदेखील याबाबत माहिती जाणून घेत जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर केला आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून एक वा दोन दिवसात या बालकांचा बिहारमधील बालकल्याण समितीकडे ताबा देण्यात येईल व तेथून ही बालके पालकांना सोपवली जातील.

मदरशाबाबत अहवाल मागितला : पथक बिहारातच
संशयित आरोपी मौलाना मोहम्मद अंजर आलम याने कारवाईप्रसंगी 29 बालकांना सांगलीतील तैयबे एज्युकेशन वेलफेअर फाऊंडेशन मदरसा व यतीमखाना, एमआयडीसी कुपवाड, जि.मिरज येथे नेत असल्याचे सांगितल्यानंतर लोहमार्ग पोलिसांचे उपनिरीक्षक राजेंद्र पाटील व पथक संबंधित मदरशात जावून आले. सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांच्या नोंदणी पडताळणीची मागणी करण्यात आली आहे मात्र अद्याप ते प्राप्त झालेले नाही त्यामुळे मदरसा रजिस्टर्ड आहे वा नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे. निरीक्षक विजय घेर्डे व अधिकारी बिहारात जावून परतले असून दुसरे पथक मात्र बिहारात अद्यापही काम करीत असल्याचे घेरडे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !