यावल तालुक्यातील कृषी निविष्ठा केंद्रांची कृषी विभागामार्फत झाडाझडती
यावल : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी केली. यावेळी पथकाने कुठल्याही परीस्थितीत लिंकिंग, जादा दराने विक्री, काळा बाजार होणार नाही याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या तसेच अनियमितता आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा ईशारा अधिकार्यांकडून देण्यात आला.
कृषी केंद्रांच्या तपासणीने उडाली खळबळ
कृषी केंद्र तपासणी प्रसंगी तालुका कृषी अधिकारी अजय खैरनार, कृषी अधिकारी प्रकाश कोळी, पंचायत समिती कृषी अधिकारी धीरज हिवराळे, कृषी पर्यवेक्षक श्रीमती कंकाळ आदी उपस्थित होते. खरीप हंगामात सर्व निविष्ठा शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत विक्री व्हाव्यात, यादृष्टीने विक्रेत्यांकडील साठा रजिस्टरची तपासणी करण्यात आली. प्रामुख्याने तालुक्यातील मोठ्या गावातील अधिकृत विक्रेत्यांच्या कृषी केंद्रांवर तपासणी करण्यात आली. शेतकर्यांनी निविष्ठा घेताना पक्के बिल घेणे, जादा दराने विक्री सुरू असल्यास कृषी विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले. यावल तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा सेवा केंद्रांची, कृषी निविष्ठा गोदामांची भरारी पथकाद्वारे तपासणी करण्यात आली.
