मुक्ताईनगरचे आमदार दमदार : स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहोचली सोनोटीत गावात बस
बोदवड : स्वातंत्र्यानंतर प्रथमच सोनोटी या गावात बस पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद दिले. विभागीय नियंत्रकांनी केलेल्या सर्व्हेत नाडगाव रेल्वे स्टेशन परीसरातील सोनोटी रस्त्यावर वाहनाला वळण घेता येत नसल्याने हा रस्ता डेंजर झोनमध्ये असल्याने या गावात बस सेवा सुरू झालेली नव्हती मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर बससेवेला सुरूवात करण्यात आली.
आमदार दमदार : एका फोनद्वारे सुरू झाली बस
ग्रामस्थांच्या तक्रारीची आमदारांनी दखल घेत सूचना केल्यानंतर बोदवड येथून जुनोना गावासाठी सुटणारी बस बोदवड-नाडगाव-सोनोटी-उजनी मार्गे जुनोना मार्गाने सुरू करण्यात आली. शुक्रवार, 30 जून रोजी बसची पहिली फेरी झाली. गावात प्रथमच बस आल्यानंतर ग्रामस्थ व के.जी.पाटील हायस्कूल नाडगाव येथील शिक्षक व कर्मचार्यांनी चालकासह वाहकाचा रूमाल-टोपी देवून सन्मान केला. दरम्यान, नाडगावच्या के.जी.पाटील हायस्कूलची 1983 मध्ये स्थापना करण्यात आली असून गेल्या 40 वर्षात एकदाही बस सोनोटी गावात पोहोचली नसल्याचे हायस्कूल चेअरमन किशोर पाटील म्हणाले शिवाय या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय आता टळणार असल्याचे ते म्हणाले.

