बातमी नेहमी भूतकाळातच लिहावी ः राज्य पुस्तक मंडळाच्या तज्ज्ञांच्या अजब सल्ल्याने आश्चर्य
शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी तज्ज्ञांच्या कार्यक्षमतेवरच उपस्थित केले प्रश्नचिन्ह
भुसावळ : राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे निर्मित इयत्ता दहावीच्या मराठी प्रथम भाषेचे कुमारभारती हे अधिकृत क्रमिक पाठ्यपुस्तक आहे. ह्या पाठ्यपुस्तकात अनेक चुका तर आहेतच परंतु पान नंबर 106 व बातमी लेखन यात बातमी तयार करण्याचे निकष दिलेले आहेत. त्यातील क्रमांक तीनमध्ये बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी, असे अत्यंत चुकीचे व बेजबाबदारपणाचे विधान करण्यात आले आहे तर पान नंबर 107 वरील बातमी लेखन नमुनाकृतीत मात्र खालील विषयावर बातमी तयार करा असे सांगून विषय दिला आहे.
तज्ज्ञांना जवाबदारीचे भान का नाही ?
सर्व नागरीकांसाठी आधार कार्डचा नंबर आपल्या बँक खात्याला लिंक करणे अनिवार्य आहे मग आता ही बातमी वरील निकषानुसार भूतकाळात कशी लिहावी? पान नंबर 106 बातमीचे क्षेत्र चौकटीत सांस्कृतिक क्रीडा या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात अशी स्पष्ट सूचना केलेली आहे तर नमुना कृती बातमी तयार करा यातील विषय यात मोठीच विसंगती आढळते. घडलेल्या घटनांच्याच नव्हे तर भविष्यात घडणार्या व वर्तमानात घडत असलेल्या घटनांच्याही बातम्या तयार होऊ शकतात ही साधी व नित्य परीचयातील बाब या मंडळातील तज्ञ मंडळींना लक्षात कशी आली नाही? की त्यांना आपल्या जबाबदारीचे भान नाही? आपली एखादी चूक राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना भोगावी लागेल ही जाणीव त्यांना का नाही? यंदा दहावीचा निकाल लवकर लागणार ,पंतप्रधान पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार, दिल्लीच्या राम मैदानावर आंतरराष्ट्रीय कृषी यंत्र प्रदर्शन सुरू अशा वर्तमानातील व भविष्यकाळातील अनेक बातम्या विद्यार्थी प्रत्यक्षात वर्तमानपत्रात वाचतात पाहतात आणि टीव्हीवर ऐकतातही. तेव्हा बातमी नेहमी भूतकाळात असावी असा पाठ्यपुस्तकातील अजब सल्ला विद्यार्थ्यांच्या मनात वैचारीक गोंधळ निर्माण करीत नाही का? असा प्रश्न शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

