पाडळसे येथील बॅटरी चोरीचा उलगडा : तीन संशयीतांना फैजपूर पोलिसांकडून अटक


Battery theft in Padalse solved: Three suspects arrested by Faizpur police यावल : फैजपूर पोलिसांनी बॅटरी चोरणार्‍या तीन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांना यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चोरट्यांकडून चोरीच्या बॅटरी व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या तर अटकेतील एका संशयिताला अल्पवयीनाचे अपहरण केल्या प्रकरणाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले.

बॅटरी चोरटे फैजपूर पोलिसांच्या जाळ्यात
फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पाडळसे येथून एकाच रात्री दोन ट्रॅक्टर व एक ट्रक या तीन वाहनांच्या बॅटरी लांबवण्यात आल्या होत्या. या तीन्ही गुन्ह्यांचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलिसांनी करीत संशयीत आरोपी मुकुंदा पंढरीनाथ सपकाळे (अंजाळे), प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे व स्वप्नील विलास मोरे (दोन्ही रा.पाडळसे) या तिघांना ताब्यात घेतले व यावल न्यायालयात हजर केले असता यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अल्पवयीन मुलीला पळवल्याचा गुन्हा उघडकीस
तपास करतांना या गुन्ह्यात तिघांसह सदाशीव उर्फ सूपडू गोपाळ कोळी (रा.पाडळसे) याचादेखील सहभाग असल्याची कबुली तिघांनी दिली व चोरी केलेल्या तीन्ही बॅटर्‍या तसेच चोरी करून पाडळसे गावात लपवून ठेवलेल्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. ही कारवाई फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, हवालदार गोकुळ तायडे, प्रभाकर चौधरी, पोलीस नाईक विकास सोनवणे, उमेश चौधरी, बाळू भोई, विजय परदेशी, ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने केली. या गुन्ह्यातील एका पसार संशयीताचा शोध पोलीस घेत आहे.

संशयीताने अल्पवयीनचे केले अपहरण
चोरीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे (रा.पाडळसे) यानेच आमोदा, ता.यावल येथून एका अल्पवयीन मुलीचेदेखील अपहरण केले होते. चौकशी केल्यावर त्याने अल्पवयीन मुलीला पोलिसांच्या सुपूर्द केले. अल्पवयीन मुलीला पोलिसांनी बाल कल्याण समितीकडे सोपवले आहे. या गुन्ह्यात देखील संशयीताला पोलिसांनी वर्ग केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !