जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभेत अंधश्रद्धेचे निर्मूलन
भुसावळ : शहरातील जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा संघाचे अध्यक्ष आर.आर.बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणपती मंदिर, सुरभी नगर येथे आयोजित करण्यात आली. प्रल्हाद बोराडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन मोहीम याबाबत प्रबोधन केले. समाजात अंधश्रद्धा कशी निर्माण होते व लोकांची फसवणूक कशी होते ? याबाबत त्यांनी काही प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. भूत दिसणे, भूताला पकडणे, मंत्राने अग्नी पेटवणे, पाण्याचा दिवा पेटवणे, रीकाम्या गडूतून सातत्याने तीर्थ देणे, अंगात येणे इत्यादींबाबत त्यांनी उद्बोधन केले.
यांची सभेला उपस्थिती
सभेस जळगाव जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव प्रल्हाद बोराडे, बोराडे (जामनेर) हे प्रमुख वक्ते होते. त्यांच्याहस्ते प्रथम श्री गणपतीस व कै अरुण मांडळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. संघाचे सचिव मधुकर तिडके यांनी वक्त्यांचा परीचय करून दिला. वक्त्यांचा सत्कार तसेच राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी.एस.पाटील, डॉ. अशोक पाटील यांचा सत्कार संघाध्यक्ष यांच्याहस्ते करण्यात आला. सचिव मधुकर तिडके यांनी आवश्यक सूचना दिल्या.
संघाध्यक्ष आर.आर.बावस्कर यांनी परंपरागत पद्धतीने सामाजिक परंपरा व अंधश्रद्धा कशा जोपासल्या जातात याबाबत मार्गदर्शन करतानाच सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबल्यास अंधश्रद्धा व रुढी यांचे निर्मूलन होईल व आपली फसवणूक होणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला. सूत्रसंचालन मधुकर तिडके तर डॉ.सुधा खराटे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी व संघाचे सभासद यांचे सहकार्य लाभले.
