फैजपूर नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी हवेत : अमोल जावळे
रावेर, यावल, फैजपूर नगरपालिका संदर्भात जिल्हाधिकारी घेणार आढावा बैठक
फैजपूर : फैजपूर नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळावेत, रावेर, यावल, फैजपूर शहरातील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या संदर्भातील अडचणी लक्षात घेता तीनही नगरपालिकांची आढावा बैठक घ्यावी आणि नवीन रेशन कार्ड व वाढीव कोटा यासह अनेक विषयांच्या संदर्भात रावेर-यावल भाजप विधानसभा प्रमुख अमोल जावळे यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची भेट घेवून निवेदन देत सविस्तर चर्चा केली.
स्वच्छता व्यवस्थापन कोलमडले
फैजपूर नगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असून पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने शहराचे पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. सद्यस्थितीत प्रशासनाच्या अभावामुळे शहरात गेल्या दोन महिन्यांपासून विविध भागात नियमित पाणीपुरवठा होत नाही. सर्व ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पूर्णवेळ मुख्यधिकारी नसल्याचा परीणाम नगरपालिका प्रशासनावर सुध्दा झाला आहे. यामुळे पालिकेची कर वसुली तसेच नागरीकांची महत्वाचे कामे ही होत नसून याचा मनःस्ताप शहरातील नागरीकांना होत आहे. सर्व अडचणी पाहता लवकरात लवकर पूर्ण वेळ मुख्याधिकार्यांची नेमणूक व्हावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी घेणार बैठक
सोबतच रावेर, यावल, फैजपूर शहरातील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या संदर्भातील अडचणी लक्षात घेता तीनही नगरपालिकेंची आढावा बैठक घ्यावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली असता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी लवकरच तीन पैकी एका नगरपालिकेत भेट देवून आढावा बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले. नवीन रेशन कार्ड साठी येणार्या अडचणी आणि वाढीव कोटा या सह अनेक विषयांवर या वेळी चर्चा झाली.
