पाडळसे येथील पोस्ट ऑफिसमध्ये धाडसी चोरी : 61 हजारांची रोकड लांबवली
Bold theft in the post office at Padalse : Cash of 61 thousand was recovered यावल : तालुक्यातील पाडळसे येथील मुख्य चौकात असलेल्या भारतीय डाक विभागाच्या कार्यालयाचे कुलूप तोडत चोरट्यांनीं 61 हजारांची रोकड लांबवल्याचा प्रकार सोमवारी सकाळी निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस यंत्रणेची धाव
पाडळसे गावातील मुख्य चौकात भारतीय डाक विभागाचे कार्यालय असून सोमवारी सकाळी या कार्यालयाचा दरवाजा उघडा दिसल्याने नागरीकांनी पोस्टाच्या कर्मचार्यांना व फैजपूर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, हवालदार उमेश चौधरी, बाळू भोई, गुलबक्ष तडवी पथकासह दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. घटनास्थळी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. पथकातील संदीप परदेशी, मनोज पाटील यांनी हॅप्पी या श्वानाने मदतीने माग काढण्याचा प्रयत्न केला तर ठसे तज्ज्ञ पोलीस उपनिरीक्षक डोंगरे, हवालदार सचिन चौधरी यांनीदेखील ठसे टिपले. कार्यालयाचे कुलूप तोडून तिजोरीतील 61 हजारांची रोकड लांबवल्याचे समोर आले आहे. भारतीय पोस्ट विभागाचे एस.वाय.बी. भूषण सैंदाने, यावल उपविभागाचे निखील पारस्कर, अनिकेत गाडे, ब्रांच पोस्टमास्टर अविनाश प्रकाश चौधरी आदींनी धाव घेतली. फैजपूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
