पूजा रामाशी मात्र मैत्री रावणाशी : भुसावळात पूज्य साध्वी संवेगनिधीश्रीजी
भुसावळ : दसर्याला भलेही रावणाचा पुतळा आपण जाळतो मात्र हृदयात बसलेल्या रावणरूपी विचारांचे दहन करणे ही काळाची गरज आहे. आपण पूजा भलेही रामांची करतो मात्र मैत्री रावणाशी करतो, असे विचार पूज्य साध्वी संवेगनिधीश्रीजी यांनी येथे व्यक्त केले.
हृदयातील रावणाच्या पुतळ्याचे दहन गरजेचे
शहरातील तेरापंथ भावनात रामायणाला केंद्रस्थानी ठेवून उपस्थित श्रोत्यांना उपदेश करताना त्यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, आपण दसर्याला रावणाचा पुतळा जाळतो पण आपल्या हृदयात बसलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन खर्या अर्थाने करणे आवश्यक आहे. ज्यावेळी रावण मृत्यूशय्येवर होता तेव्हा लक्ष्मणणाला रावणाने तीन यशस्वी राजकारणाची रहस्य सांगितली. त्यानुसार चुकीचे काम करण्यापूर्वी चांगल्या व्यक्तींचा सल्ला घेणे, चांगले कर्म करण्याची इच्छा असल्यास ते त्वरीत करावे व कधीही क्रोध करून आवेशात येऊ नये. या तीन गोष्टी आपल्या जीवनासाठी उपयुक्त आहेत.
जो चुका करत नाही तो राम. चूक करून पश्चाताप करणारा रावण आणि जो चुका करतो त्यावर पश्चातापही करत नाही तो दुर्योधन. आम्हाला राम होता येत नाही पण दुर्योधन सुद्धा होऊ नये. जो दुसर्यांचं मन आणि दुसर्यांना मान देऊन जिंकू शकतो तोच महान बनू शकतो. महान बनवणे सामान्य आहे पण महान बनवून सामान्य राहणे हे विशेष आहे. आपण काय करावं हे रामायण आपल्याला शिकविते तर आपल्याला काय हवं हे आपल्याला महाभारतातून शिकायला मिळते, असेही पूज्य साध्वी संवेगनिधीश्रीजी म्हणाल्या.
