शून्य ते 18 वयोगटातील बालकांवर विविध आजारांचे उपचार होणार मोफत
भुसावळ : शुन्य ते 18 वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम जाहीर केला आहे. विविध प्रकारच्या आजारांवर आता लाखो रुपये खर्च करण्याची पालकांना आवश्यकता नाही. करारानुसार शुन्य ते 18 वयोगटातील बालकांच्या जन्मजात हृदयरोग (कनंजेनायटल हर्ट डिसीज), अस्थिरोग शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक सर्जरी, मेंदूची शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जरी), ई.एन.टी. शस्त्रक्रिया (क्वाक्लिअर इंप्लान्ट), डोळ्यांचे उपचार हे उपचार होणार आहेत. हे उपचार झाल्यावर त्यांचे पैसे आर.बी.एस. के. ने ठरलेल्या दरानुसार देण्यात येतील. याबाबतचा करार 23 मे रोजी कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक डॉ.रघुनाथ भोये यांनी केला आहे.
येथे कराल संपर्क
योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या आरबीएसके डॉक्टर किंवा जिल्हा रुग्णालयात चौकशी करावी किंवा आपल्या जवळील आरोग्यसेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भुसावळातील आरोग्य सेवक मयूर अंजाळेकर यांनी केले आहे.
योजनेसाठी हे आहेत पात्र व निकष
या उपचारांसाठी शुन्य ते 18 वयोगटातील सर्व बालके पात्र आहेत. त्यासाठी त्या बालकाचा शाळा शिकत असलेला दाखला, अंगणवाडी दाखला, बाळाचे आधारकार्ड, डॉक्टरांचे शस्त्रक्रियेचे अंदाजपत्र (मुंबई मधील हॉस्पिटल) आणि जिल्हा शल्यचिकित्सकांचे मंजुरी पत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. काही अडचण आल्यास महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष आरोग्यसेवक मयुर राजेंद्र अंजाळेकर (भुसावळ, 9503900740) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
