हिंगोण्यात प्लॉट नावावर कारणावरून 31 वर्षीय तरुणाला चौघांची मारहाण
यावल : यावल तालुक्यातील हिंगोणा गावातील मुंजोबा नगरात चौघांनी प्लॉट नावावर करून द्या, असे सांगत वाद घातला व भांडण करू नका, असे सांगणार्या 31 वर्षीय तरुणाला चौघांनी मारहाण करीत दुखापत केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चार जणांविरुद्ध दाखल
हिंगोणा, ता.यावल येथील हर्षल भागवत सावळे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते गावातील मुंजोबा नगर भागात आई-वडिलांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या आई-वडिलांशी राजेंद्र यादव धनगर, निलेश राजेंद्र धनगर, दिनेश राजेंद्र धनगर व संगीता राजेंद्र धनगर (जुनी पोस्ट गल्ली, हिंगोणा,) या चौघांनी वाद घातला व हा वाद हर्षल सावळे सोडवायला गेले असता चौघांनी त्यांना काठीने मारहाण केली. त्यांच्या डोक्याला व डाव्या हाताला दंडावर दुखापत करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र महाजन करीत आहे.
