Varangaon-Talvel sub-irrigation scheme वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेमुळे 33 हजार एकर शेतीला पाणी
आमदार एकनाथरराव खडसे : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या पूर्तीसाठी इतिहासात नाथाभाऊंच्या नावाची नोंद होणार
Water for 33 thousand acres of agriculture due to Varangaon-Talvel sub-irrigation scheme
भुसावळ : पाटबंधारे मंत्री असताना वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेला 12 ऑक्टोबर 1998 रोजी मान्यता दिली होती. त्यावेळी 223 कोटींची मान्यता देण्यात आली मात्र त्यानंतर या योजनेत अनेक गावे समाविष्ट करण्यात आल्यानंतर आज योजना तेराशे कोटींवर पोहोचली आहे. कोल्हापूरप्रमाणे जळगाव जिल्हा सिंचनाखाली यावा, असे स्वप्न पाहिले होते व ते प्रत्यक्षात साकारले जात असल्याचे समाधान असून या योजनेमुळे आता भुसावळसह मुक्ताईनगर व बोदवड तालुका संपन्न होणार असल्याचा विश्वास आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केला. शहरातील अटल निवासस्थानी शुक्रवारी दुपारी चार वाजता झालेल्या पत्रकार परीषदेत त्यांनी योजनेचे महत्व व व्याप्तीबाबत सखोला माहिती दिली. ते म्हणाले की, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेवरील ओझरखेडा साठवण तलावातून 13 हजार 258 हेक्टर क्षेत्राला बंदिस्त पाईपलाइन सिंचनासाठी वितरण प्रणालीसाठी 541 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. हे काम हैद्राबाद येथील मे. जीव्हीपीआर इंजिनिअरींग प्रा.लिमिटेड या कंपनीला देण्यात आले असून 48 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या योजनेमुळे 13 हजार 252 हेक्टरावरील 33 हजार एकर शेतीला पाणी मिळणार आहे. जुलै 2024 पर्यंत चार तेे सहा गावांना व पुढील कालावधीत सर्व 52 गावांतील शेतकर्यांना सिंचनासाठी बांधावर पाणी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन टप्प्यात 52 गावांचा योजनेत समावेश
भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील 52 गावांतील 13 हजार 258 हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी तापीपाटबंधारे विभागाने 541.60 कोटी रुपयांची निविदा काढली होती. हे काम हैद्राबाद येथील ठेकेदाराने घेतले असून आता नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत या पाईपलाइनसाठी सर्वेक्षण, संकल्पनेचे काम पूर्ण केले जाईल. या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. जूलै 2024 पर्यंत चार ते सहा गावांतील शेतकर्यांना पाणी मिळेल, अशा पध्दतीने हे काम होईल. पहिल्या टप्प्यात 12 तर दुसर्या टप्प्यात 40 गावांचा समावेश राहणार आहे. या योजनेतून हतनूर धरणातून वाहून जाणारे पाणी उचलून ओझरखेडा साठवण तलावात टाकून ते बंदिस्त पाईपलाइनने शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहोचवले जाणार आहे.

कॅनॉल नव्हे बंदिस्त पाईप लाईनचा प्रयोग
एरव्ही सिंचन योजनांमध्ये कॅनॉलचा वापर केला जातो मात्र तळवेल उपसा सिंचन योजनेत पाईपाचा वापर केला जाणार आहे त्यामुळे विजेच्या वापराविना ग्रॅव्हेटीच्या सहाय्याने प्रत्येकी एक हेक्टर क्षेत्रापर्यंत शेतकर्यांना बंदिस्त पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा होईल. या योजनेसाठी महानिर्मितीने 158.68 कोटी रुपये दिले आहेत. यामुळे या ओझरखेडा साठवण तलावातून औष्णिक वीजनिर्मिती केंद्रालाही पाणीपुरवठा होईल.
श्रेय कुणीही घेवो ; नाव नाथाभाऊंचेच कोरले जाणार
ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याबाबतचा निर्णय दिलीप-वळसे पाटलांनी घेतला होता त्यामुळे श्रेयवादाला अर्थ नाही. या योजनेची संकल्पना मुळातच नाथाभाऊंची आहे त्यामुळे इतिहासात नाथाभाऊंचेच नाव कोरले जाणार असल्याचे खडसे म्हणाले. हीच योजना नव्हे जिल्ह्यातील अनेक योजनांबाबत त्यांनी यावेळी उदाहरणे दिली.
