रावेरच्या नागझिरी नदीवर हवा उंच पूल
रहिवाशांची मागणी : दोघ बाजुने संरक्षण भिंतीची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
रावेर : जुना सावदा रस्त्यावरील नागझिरी नदीवर नवीन उंच पूल आणि नदीकाठावर दोन्ही बाजूने संरक्षण भिंत बांधण्याची मागणी शहरातील गायत्रीनगर गुरुदेव नगरातील रहिवासी यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पावसाळ्यात नागरीकांसह वाहनधारकांची गैरसोय
नवीन विश्रामगृह ते जुना सावदा नाका या दरम्यान असलेल्या नागझिरी नदीवरील छोट्या फरशी पुलाचे बांधकाम सुमारे 80 ते 90 वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. हा पूल अतिशय जीर्ण होवून त्याची उंची कमी झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरुन पुराचे पाणी वाहते त्यामुळे सदरील रस्ता बंद होवून नागरीकांचे अतोनात हाल होतात. हा रस्ता हा जळगाव, भुसावळ, फैजपूर, सावदा या शहरातील रस्त्याने तसेच ग्रामीण भागातील रस्त्याने जोडला असल्यामुळे व या रस्त्यावरून पुढे रावेर रेल्वे स्टेशन, रावेर पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय रावेर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, रावेर, ग्रामीण रुग्णालय, रावेर, तालुका कृषी कार्यालय, रावेर, जिल्हा परीषद बांधकाम विभाग, रावेर, जि.प. सिंचन विभाग रावेर, रावेर तालुका खरेदी-विक्री संघ कार्यालय इत्यादी सह शहारातील सर्व शाळा व विद्यालये या रस्त्याने पुढे जाऊन मिळतात. त्यामुळे सदर रस्त्यावरून नागरीकांची, अधिकारी वर्गाची , शालेय विद्याथ्यांची आणि ग्रामिण भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
पुरात वाहून उपनगराध्यक्षांचा मृत्यू
नागझिरी नदीवरील पूल हा अत्यंत जीर्ण झाला असून त्याची उंची कमी असल्याने या पुलावरून नदीच्या पुराचे पाणी वाहते. नागरीकांच्या जीवास कायम धोका असतो. माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील यांचा याच धोकेदायक पुलावरुन घरी जात असतांना अचानक पाण्याचा लोंढा येऊन त्यांना पुराच्या पाण्यात बुडून नुकताच दुर्दैवी मृत्यू ओढवला असून वारंवार घडलेल्या या घटनांमुळे नागरीकांच्या भावना तीव्र होवून प्रशासनाविरुध्द नाराजी निर्माण होत आहे. नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर पुल पाडून नवीन उंच पुल बांधणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नदीच्या दोघा बाजुने संरक्षण भिंत बांधणे, नदीच्या एका बाजुला गायत्रीनगर असून दुसर्या बाजुने गुरुदेवनगर आहे. या दोघा नगरामध्ये नागरीक वास्तव्य करीत असल्याने नागरीकांना पूर आला की जीव मुठीत घेऊन जगावे लागते. केव्हा केव्हा रात्री जागरण करावे लागते. पाणी आपल्या घरात तर घुसणार नाही ना या चिंतेमुळे दोन्ही कॉलनीतील नागरीक त्रस्त आहे. शासनाने पुलाचे काम त्वरीत सुरू करून पुलाचे दोघा बाजुने संरक्षण भिंत आदित्य इंग्लीश मेडियम स्कूलपर्यंत बांधून नागरीकांची ही समस्या युध्दपातळीवर सोडवावी व लवकरात-लवकर कामाची सुरुवात करावी अशी मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना विनोद नारायण तायडे, राजेंद्र मधुकर अटकाळे, पुंडलिक कोंघे, मयूर तायडे, अतुल अटकाळे, गोपाळ मिस्त्री, महेंद्र लोंढे, सचिन पाटील, हिरामण चौधरी, रघुनाथ कोंघे, अनिल रायमळे, पवन श्रीनामे, गुरुदेव नगरामधील व गायत्री नगर मधील बहुसंख्य नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
