भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकांवरील कारवाईची निष्पक्ष व्हावी चौकशी
भुसावळकरांचे प्रांतांना निवेदन : लाच प्रकरणाची एसीबीच्या निष्पक्ष अधिकार्याकडून चौकशीची मागणी
There should be a fair investigation into the action against Bhusawal market police inspectors भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकांसह तिघांना बायोडिझेल प्रकरणात लाच मागितल्याच्या आरोपाखाली नुकतीच अटक करण्यात आली मात्र बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांचा लाच प्रकरणाशी संबंध नसून त्यांना याप्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप भुसावळातील नागरीकांनी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना शुक्रवारी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला आहे. या सर्व प्रकरणाची एसीबीत काम केलेल्या अनुभवी अधिकार्याद्वारे चौकशी करण्याची मागणीही नागरीकांनी केली आहे.
खोट्या तक्रारीद्वारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न
प्रांताधिकारी प्रशासनाला दिलेल्या लेखी निवेदनानुसार, पोलीस निरीक्षक गायकवाड यांचा शहरात मोठा दबदबा होता त्यामुळे गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए कायद्याखाली अनेक कारवाया करण्यात आल्याने शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण घटले होते. सर्वसामान्य नागरीकांसह व्यापारीवर्गाचा कायद्यावरील विश्वास अधिक द़ृढ झाला होता मात्र काही समाजकंटक व सराईत गुन्हेगारांनी खोट्या तक्रारीच्या आधारे त्यांना अडचणीत आणण्याचा व बदली करण्याचा प्रयत्न चालवला होता.

कारवाईचा निषेध करणार्यांना मिळताय धमक्या
बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यावरील कारवाईचा निषेध करणार्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या इसमांकडून धमक्या दिल्या जात आहेत. काही पोलीस कुटूंबियांना तसेच पोलीस निरीक्षकांवर उपचार करणार्या डॉक्टरांनादेखील धमकावले जात असून त्यामुळे त्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. आगामी काळातील निवडणुका पाहता दोन महिन्यात या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी व पोलीस निरीक्षक गायकवाड यांना पुन्हा भुसावळात नियुक्ती द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रांताधिकार्यांना निवेदन देतांना माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, शेख पापा शेख कालू, राजेंद्र आवटे, शेख साबीर आदींची उपस्थिती होती तर निवेदनावर 38 नागरीकांची नावे आहेत.
