मुक्ताईनगर बसस्थानकाचा प्रश्न विधानपरीषदेत : आमदार खडसेंनी वेधले लक्ष


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर बसस्थानकाच्या दुर्दशेबाबात विधानपरीषदेत आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रश्न मांडत लक्ष वेधले. जळगाव जिल्ह्यात परीवहन महामंडळाच्या बसची संख्या, अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे प्रवाशांचे विशेषतः विद्यार्थ्यांचे हाल होत असून बसस्थानकांची दुरवस्था झाली आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरीषदेत प्रश्न मांडताना जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या बसेस कमी असून अपुरी कर्मचारी संख्या असल्यामुळे लांब पल्ल्याच्या बस बंद करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पावसाळ्याचे कारण दिले जाते तसेच विद्यार्थ्यांसाठी ज्या बस आहेत पुरेशा नाहीत, त्यावर कर्मचारी नाहीत, विद्यार्थी वेळेवर बसची वाट बघत बस स्थानकात तास न तास बसलेले राहतात आणि वेळेवर त्यांना बस नसल्याने किंवा कर्मचारी नसल्याने बस रद्द झाल्याचे सांगण्यात येते अशा ठिकाणी पुरेशा बस आणि कर्मचारी उपलब्ध करून देणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

बीओटी तत्वावर उपक्रम राबवणार
मुक्ताईनगर बस डेपो आणि बस स्थानकांची दुरवस्था झाली असून बस स्थानकांवर प्रसाधनगृह व इतर सुविधांची वाणवा आहे. बस स्थानकांची दुरुस्ती करण्यासाठी शासन काही उपाययोजना करणार आहे का? आणि विद्यार्थ्यांसाठी नियमित बस उपलब्ध होण्यासाठी विशेष उपाययोजना करणार आहेत का? असा प्रश्न एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, नवनवीन योजना व महिलांना 50 टक्के सुट दिल्यामुळे गर्दी वाढली असून विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी निश्चितपणे उपाययोजना करण्यात येतील. बस स्थानकांची स्वच्छता करणे, रंगरंगोटी करणे, काँक्रीटीकरण करणे यासाठी सरकारने 400 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असून बीओटी तत्वावर काही नवीन उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !